
कविता : 🌷 " रिता "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
दिवस असे की पंखांवर स्वार होऊन येतात
संध्याकाळ आणि रात्र भुर्रकन् उडून जातात
सकाळ कधी झाली अन् कधी सरुनही गेली...
सोनसळी सांज उगीचची हुरहूर लावून गेली !
आयुष्याची झुकु-झुकु गाडी जी सुसाट सुटली
अधली-मधली स्टेशनंही, लीलया सोडून दिली
धोक्याचा लाल कंदील मिणमिणता असूनही...
दहा-हत्तींच्या उसन्या बळाने धावतच राहिली !
क्षणिक थांबून मागे वळून बघायची नाही उसंत
काय मिळवलं, काय गमावलं कसलीच ना खंत
लाथ मारीन तिथे पाणी काढीन हा एकमेव मंत्र
आधी केले मग सांगितले हे कायम वापरले तंत्र
थंड डोक्याने विचार केल्यावर चुका जाणवतात
हातचं राखून त्यातच नवीन भर घालत असतात
खूप काही मिळवताना हातचं घालवायचं नसतं,
नंतर पश्यात्ताप होऊन कांहीच साध्य होत नसतं !
जीवनात दर क्षणन्-क्षण भरभरुन जगायला हवा
प्रत्येक अनमोल प्रसंग, नितांत जपायलाही हवा
पूर्वी चुका झाल्या, नव्या न होऊ देण्याची दक्षता...
भरलेला घडा जरी आज, न जाणो कधी होई रिता...
भरला असलेला घडा, न जाणो कधी होईल रिता !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















