
🌷 श्रावण-पूर...…
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
श्रावण म्हटला की सर्वांना हमखास आठवतो,
भुरभुरणारा सुखदसा सडा घालणारा पाऊस...
चार थेंब झेलत-झेलतच आपण छत्री उघडतो
तेव्हढ्यात पठ्ठ्या, धूम ठोकून पसारही होतो...
बघता बघता कोवळ्या उन्हात न्हाऊन निघतो…
थंड शिडकाव्यात, मखमली रम्य विश्वात रमतो…
पण पाऊस जेव्हा पापण्यांतून ओघळू लागतो…
तेव्हा मात्र तो न थांबता चक्क श्रावण-पूर होतो…
वेळी-अवेळी, न सांगता-सवरता, हजेरी लावतो…
त्याचा अंदाज मात्र खंद्या-तज्ञांना कदापि नसतो…
हवामान-खात्याच्या विक्रमांना तो मागे टाकतो…
केव्हा "दत्त" म्हणून हजर होईल पत्ताही नसतो…
प्रेमाच्या, कौतुकाच्या शब्दांनी तो जो सुरू होतो…
सुखाची चाहूल लागली तरी तो वाहातच राहतो…
जवळच्या व्यक्तिच्या काळजीने निर्बंधित होतो…
भविष्याच्या अंतरंगी डोकावून विरघळत जातो…
भूतकालीन आठवणींनी बेजार होऊन पडतो…
कधी कधी तो जणूकाही निमित्तालाच असतो…
एकवेळ खराखु-या पूरावर तोडगा निघू शकतो…
पण श्रावण-पूराच्या तडाख्याला पर्याय नसतो…
तान्ह्या बाळाच्या रडण्याने श्रावण-पूर थबकतो…
मुलास परदेशी धाडताना, हृदयांतरात बरसतो…
मुलीची पाठवणी करताना धाय मोकलून पडतो…
माहेरच्या नुसत्या आठवणींनी पाझरतच राहतो…
वर्षाच्या बाराही महीन्यांत तो धो-धो कोसळतो…
आयुष्यभर सुखात-दु:खात श्रावणपूर साथ देतो…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















