कविता:🌷”ईश्वराधीन-नाती”


कविता : 🌷 " ईश्वराधीन-नाती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

नात्यांचे बंध म्हणजे जणू समईच्या दिव्य-ज्योती...
मंद-शांत, संतत-संयत तेवणाऱ्या स्नेह पूर्ण-वाती...
भातुकलीपासून गोळा होती जिवाभावाची-मंडळी...
भाग्यवंताना लाभती असे सखे-सोबती-मित्रमंडळी... 

काही महत्वपूर्ण अशी नाती, ईश्वराधीन असतात...
प्रत्येकाला आई-वडील या तत्वानुसार मिळतात...
पूर्व-सुकृतानुरूप जन्मगाठी बांधलेल्या असतात...
आयुष्यातील सुख-दु:खाचे हे साथीदार असतात...

अगणित पूर्व जन्मोजन्मीची-पुण्याई फळा येते...
तेव्हा मातृ-पितृ-छत्रछाया आयुष्यभराची लाभते...
केवळ सद्-भाग्यानंच होतं भावंडाचं-प्रेम लाभणं...
अन् एकाच माता-पित्याच्या पोटी जन्माला येणं...

पितृवत् अपार माया करणारे प्रेमळ वडील-बंधू...
बाल्यावस्थेत जो आधारस्तंभ, तो होतो केंद्र-बिंदू...
आईची उणीव अजिबात भासूही न देणारी बहीण...
भगवंताच्या कृपा-प्रसादाविना, मिळणंच कठीण...

अक्षरशः जीव ओवाळून टाकावा असं अभूतपूर्व प्रेम...
विधात्याच्या नियोजनानुसार नेमका अचूक लागे नेम...
सुख-देणारी, अभिमान वाटावा अशी, गुणी मुलंबाळं...
नक्कीच कित्येक-जन्मींच्या सत्कर्म-सत्कृत्यांची फळं...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!