कविता : 🌷 " मूर्तिमंत वात्सल्य " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
घर म्हटलं की, डोळ्यासमोर येती-वात्सल्य-मूर्ती-आई अन् बाबा घरच्या सुखा-समाधानावर त्या दोघांचाही पूर्णपणे असतो ताबा स्त्रीविना कुटुंब पूर्ण होत नाही, सुदृढ कुटुंबांशिवाय समाज नाही संयम, धैर्य, जिज्ञासा-अखंड प्रेमाचा अन् प्रेरणेचा स्त्रोत असते ती
सुशिक्षित, कर्तबगार, हुशार स्त्रीमुळे कुटुंबाचं कल्याण होतं नेहमी भावी पिढ्या-ओघाने पूर्ण समाजोउन्नतीसाठी ठाम उभी असे स्त्री प्रत्येक स्त्रीला संधी मिळता, पूर्ण झोकून देऊन संधीचं सोनं करते आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहूनही, कौटुंबिक-कर्तव्यही निभावते
राणी लक्ष्मीबाईंनी दत्तक मुलास पोटाशी बांधून रणांगण गाजवलं जिजाऊंच्या प्रेरणेने, शिवरायांनी मराठ्यांचं नव-साम्राज्य उभारलं दरेक यशस्वी व्यक्तीच्या पाठी किमान एक स्त्री ठाम उभी असते कठीण प्रसंगी निडरपणे सामोरी जाते, तत्परतेने त्याची ढाल बनते
मायेने लालन-पालन करुन-मनोबल वाढवून, उदात्त ध्येय बिंबवते बालपणीच सुसंस्कारांसह, स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणाही देते वास्तविकत: स्त्री-जन्म आणि स्त्री-रुप म्हणजेच मूर्तिमंत वात्सल्य, स्त्री म्हणजे शुद्ध शालीनता अन् आल्हाददायी-पवित्र असं मांगल्य
स्त्री म्हणजेच परमोच्च कोटीचं मातृत्व, स्त्री म्हणजे अखंड कर्तृत्व स्त्री म्हणजे भक्कम असं नेतृत्व, स्त्री म्हणजेच सुसंस्कारांचं सत्व स्त्री म्हणजे दातृत्व, स्त्री म्हणजेच सदाचरणाचं प्रत्यक्ष ज्ञान व तत्व स्त्री म्हणजेच शिव आणि शक्तिचं त्रिकालाबाधित साक्षात्कारी सत्य
Leave a Reply