कविता:🌷”छुप्या नरकासुरांचा वध”


कविता : 🌷 " छुप्या नरकासुरांचा वध "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

आज कृष्ण-सत्यभामा द्वयीने, मध्यरात्रीला...
क्रूर -दुराचारी अशा नरकासुराचा वध केला...
मुक्त केले, छळवणूकीने ग्रासलेल्या प्रजेला...
सूर्योदय-होण्याच्या आधीच क्रूरात्मा-वधला...

भुदेवीच्या रूपे सत्यभामा कृष्णास साथीला
अशारितीने शूरवीर-द्वयीने मारून राक्षसाला,
बंदिवासातील सोळा सहस्र बंदिवान-अबला
बंदिगृहातून-घोर अत्याचारांतून,  मुक्त केल्या

असुर-वध-स्मृती म्हणून अभ्यंग-स्नानाची प्रथा...
सचैल स्नान, धूत-वा कोरी-वस्त्रं, फराळ-नाश्ता...
अशी सुरु झाली,उत्सव साजरा करण्याची प्रथा...
आजतागायत जन-मानसात रुजली आहे कथा...

आजही गरज आहे, श्रीकृष्ण-सत्यभामा बनून...
समाजातील छुप्या, अत्याचारी-दैत्यांना हूडकून...
अत्यंत-जरुरीचं-आहे छुप्या-नरकासुरांस-मारणं...
आवश्यक आहे, त्यांचा समूळच निप्पात करणं...

नरकासुर जसे बाह्य-जगातले, तसेच मनातलेही..
त्या सर्वांना हुडकून काढून नष्ट करणे, जमेलही...
कारण "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता गळे तेलही"
जर मनावर घेऊ, तर लीलया उचलू मेरु-पर्वतही...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!