कविता : 🌷' ऋणानुबंध '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
आज फारच ओकंबोकं-सुनं-सुनं वाटतं आहे
जणूकाही घरात, सगळं-काही बिनसलं आहे
दर-रोज सदैव माझ्या नजरेसमोर असणारा
माझ्या अंतर्मनाला सततची सोबत करणारा
डोळ्यांना थंडावा देत हळूच मन-मोहवणारा
चहा-पिताना, नाश्ता करताना, टिव्ही बघताना
मी सुखात असो वा दु:खात, मूक संवाद चाले
काहीही न सांगताही, त्याला सर्वकाही आकळे
समोर तो मूकपणे कायम उभा-साथ द्यायला
आज त्याजागी कोणी नाही आपलं म्हणायला
त्याचा कुणा काहीच त्रास नव्हता काडी इतका
मग का उगा असे उखडून, फेकून दिले त्याला ?
जीवनात कशाचाही भरवसाच नाही, हे पटलं
शांत व्रतस्थ वृक्षाने कुणाचं काय हो बिघडवलं ?
पानगळ सहन करुनही न चुकता तो बहरायचा
थंड-शितल-सावली देऊन, शांत बघत राहायचा
त्याचं अस्तित्व, हा आयुष्याचा अविभाज्य भाग
त्याच्या साक्षीने, क्षणात फुलायची सुखाची बाग
तो नसताना आनंद कसा दुथडी भरुन वाहणार ?
माझ्या हिरमुसल्या मनाला कोण उभारी देणार ?
त्याचे अन् माझे नक्कीच ऋणानुबंध असावेत
एरव्ही असे ढळ-ढळ अश्रु का बरं ओघळावेत ?
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply