🌷अवघा काळोख श्रीकृष्ण झाला…

🌷अवघा काळोख श्रीकृष्ण झाला...
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

यमुनेच्या तीरावरी, रास रंगला...
मनामनात कृष्णनाद दुमदुमला…
अवघा परिसर कृष्णमय झाला...

सृष्टीचा कण-न्-कण अंकुरला,
वसंत-रूपे चरा-चरात बहरला...
संपूर्ण ऋतू कृष्ण-सखा झाला...

भूवरी जणू स्वर्गच अवतरला,
कोकीळ-कंठी सुस्वर फुटला...
नादब्रह्मातून कृष्ण निनादला...

आमराईतून मोहोर घमघमला,
नभी पक्षांचा थवा चिवचिवला...
सजीव-सृष्टी-रूपे कृष्ण हसला...

ढगांच्या आडून चंद्र डोकावला,
जल-लहरींवर कवडसा पडला...
रजनीनाथ अवघा कृष्ण झाला...

भेटण्या वासरां कळप निघाला,
घुंगरूंच्या तालात सुसाट सुटला…
अवघा काळोख श्रीकृष्ण झाला...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!