कविता:🌷”पुनः पुन्हा जन्मा येणे नाही”


कविता : 🌷 "पुनः पुन्हा जन्मा येणे नाही"
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

मन हे प्राजक्त ...
होऊनी विरक्त,
पुनरपि " रत " ...
होणे नाही ......

मन हे अबोली ...
वाहिलं ते पायी ...
पुनरपि " कायी " ...
येणे नाही ......

अर्पूनी कमळ ...🌷
भाव हा निर्मळ ...
पुनरपि " पाशी "...
गुंतंणे नाही ......

मन हे जास्वंदी ...🌺
अर्पिले तव-पदी ...
संपू दे, आसक्ती ...
आता तरी ......

मन हे " अनंत " ...
भाव असे शांत ...
नको " येरझारा " ...
देवा आता ......

मन हे चमेली ...
मी चरण-धुली ...
नको मोह-जाली ...
गुंतणे आता ......

मन हा केवडा ...
भाव हा भाबडा ...
पुनरपि " विषयी " ...
रमणे नाही ......

वाहुनी चंपक ...
भाव हा सम्यक ...
पुन्हा इहलोकी ...
येणे नाही ......

मन हे बकुळ ...
भाव हा निर्मळ ...
पुनरपि " फिरुनी "
येणे नाही ......

मन हे सायली ...
चरणी वाहिली ...
कृपेची साऊली ...
द्यावी आता ......

मन हे तगर ...
आनंद-सागर ...
नैय्या करी पार ...
झणी आता ......

मन हे कर्दळ ...
भाव तो सोज्वळ ...
पुनः-पुनः जन्मा ...
येणे नाही ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!