कविता:🌷”इच्छित फल-प्राप्ती”


कविता : 🌷 " इच्छित फल-प्राप्ती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

थोर ऋषी " कात्य " यांनी घोर तप केले …
दुर्गा-मातेला " पुत्री-रुपात " मागुन घेतले …
वरदान म्हणूनी जन्म घेतला प्रसन्न देवीने,
कात्याऋषींची लेक"कात्यायनी"नाव दिले

आजच्या नवरात्रीच्या सहाव्या शुभदिनी,
पूजन-अर्चनाची उत्सव-मूर्ती कात्यायनी ...
शांत-रूप, चार भुजा, त्रिनेत्रा, वरदायिनी ...
कांती सोनपरी, शोभिवंत सुंदरी त्रिभुवनी ...

महिषासुर राक्षसाचे अतोनात अत्याचार ...
तिन्ही लोकी माजलेला नुस्ता हां-हांकार ...
विजयादशमीचा अतिशय शुभ होता वार ...
देवीने क्रूर-मुजोर दैत्यास जीवे मारले ठार ...

माजलेल्या दुष्ट, अतिक्रूर माहिषासुरास …
तिने उग्र रूप घेतले, धडा शिकविण्यास ...
देवीने, यमसदनी पाठविले त्या असुरास,
होऊन सिंहावर स्वार,नष्ट केले राक्षसास …

ही देवी मनो-सामर्थ्य, मनो-धैर्य वाढवते…
त्यामुळे "मन-शक्ति"असेही नाव पडले  ...
रुक्मिणीने कात्यायनी-देवीलाच पुजले,
कृपा-प्रसादाने तिला, श्रीकृष्ण मिळाले ...

मनोभावे जो कात्यायनी-मातेला पूजेल ...
त्यास धर्म-अर्थ-काम-मोक्ष सर्व लाभेल ...
कात्यायनी सत्यधर्म-न्याय-निष्ठा पाळते ...
भक्तांच्या वांच्छित मनोरथांची पूर्ती होते  ...

रोग-शोक-संताप-सूड-भयापासून मुक्ति ...
भूलोकी अदभूत सुदैवाची होऊन प्राप्ती,
लाभती सगळी सुखे, नाम-कीर्ती-श्रीमंती ...
नित्य साधना केल्याने इच्छित फल-प्राप्ती ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!