कविता : 🌷”मूर्तिमंत वात्सल्य”


कविता : 🌷 " मूर्तिमंत वात्सल्य "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

घर म्हटलं की, डोळ्यासमोर येती-वात्सल्य-मूर्ती-आई अन् बाबा
घरच्या सुखा-समाधानावर त्या दोघांचाही पूर्णपणे असतो ताबा
स्त्रीविना कुटुंब पूर्ण होत नाही, सुदृढ कुटुंबांशिवाय समाज नाही
संयम, धैर्य, जिज्ञासा-अखंड प्रेमाचा अन् प्रेरणेचा स्त्रोत असते ती

सुशिक्षित, कर्तबगार, हुशार स्त्रीमुळे कुटुंबाचं कल्याण होतं नेहमी
भावी पिढ्या-ओघाने पूर्ण समाजोउन्नतीसाठी ठाम उभी असे स्त्री
प्रत्येक स्त्रीला संधी मिळता, पूर्ण झोकून देऊन संधीचं सोनं करते
आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहूनही, कौटुंबिक-कर्तव्यही निभावते

राणी लक्ष्मीबाईंनी दत्तक मुलास पोटाशी बांधून रणांगण गाजवलं
जिजाऊंच्या प्रेरणेने, शिवरायांनी मराठ्यांचं नव-साम्राज्य उभारलं
दरेक यशस्वी व्यक्तीच्या पाठी किमान एक स्त्री ठाम उभी असते
कठीण प्रसंगी निडरपणे सामोरी जाते, तत्परतेने त्याची ढाल बनते

मायेने लालन-पालन करुन-मनोबल वाढवून, उदात्त ध्येय बिंबवते
बालपणीच सुसंस्कारांसह, स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणाही देते
वास्तविकत: स्त्री-जन्म आणि स्त्री-रुप म्हणजेच मूर्तिमंत वात्सल्य,
स्त्री म्हणजे शुद्ध शालीनता अन् आल्हाददायी-पवित्र असं मांगल्य

स्त्री म्हणजेच परमोच्च कोटीचं मातृत्व, स्त्री म्हणजे अखंड कर्तृत्व
स्त्री म्हणजे भक्कम असं नेतृत्व, स्त्री म्हणजेच सुसंस्कारांचं सत्व
स्त्री म्हणजे दातृत्व, स्त्री म्हणजेच सदाचरणाचं प्रत्यक्ष ज्ञान व तत्व
स्त्री म्हणजेच शिव आणि शक्तिचं त्रिकालाबाधित साक्षात्कारी सत्य

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!