कविता - 🌷 " सिलसिला खुशियों का " कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
पाहायला गेलो तर शेवटी प्रत्येकाचं, आयुष्य जातं विशिष्ट चाकोरीतूनच ... एक ठराविकच जीवन-क्रम असतो ... दिवस, आखलेल्या चालीनंच जातो ...
मग प्रत्येक दिवसाचा चेहरा-मोहरा, का भासतो नवा-आगळा-वेगळासा ? एक अख्खा-दिवस असतो प्रचंड मोठा त्यात लपलेला-अगणित क्षणांचा साठा !
पहाट, सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्र दिनक्रम म्हणजे, शेवटी नैसर्गिक-सत्र ... खंड नाही त्यात, अखंड चाले अहोरात्र हर्षाची चाहूल होता रोमांचित गात्र-गात्र
खरा आनंद मिळवायचा असेल तर ... तो आधी, थोडासा "वाटायला" हवा ... "वाटल्यावरच" होतो तो द्विगुणित, अन् पुढे वाढत जातो कैक-पटीत ...! एखाद्याच्या-वाट्याचा इवलासा हिस्सा, व्यापून टाकू शकतो, अवघ्या-विश्वा ...!
एक आनंद, दुसऱ्यास काही "देण्याचा"... एक आनंद, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा ...! एक आनंद, स्व-मध्ये फुटलेल्या पाझराचा ... सर्व आनंद मिसळून, झालेल्या गोळा-बेरजेचा ! या सगळ्याचा क्लिष्ट हिशोब, कुणी बरं ठेवायचा ?
उमलत्या फुलांचा दरवळणारा सुगंध, कुणा रोखता येतो ? अंतरीचा आनंद-झरा, कधी लपवुन लपू शकतो ? तो तर उमटतोच, चेहऱ्यावर-प्रत्येक देणाऱ्याच्या अन् तो घेणाऱ्याच्या
आयुष्य, म्हटलं तर आहे फारच सोपं ... अनुभूती द्यायची व अनुभव करायचं ... आनंद उधळायचा अन् झोकून द्यायचं ... "स्वला" हरवायचं, दुसऱ्यांच्यात शोधायचं ...
कुछ हम करें ...कुछ आप करो ... सिलसिला खुशियों का, युं चल पडेगा ... और युं हीं फिर चलता रहेगा ...!
Leave a Reply