कविता : 🌷’ रिक्त मन ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार , १६ सप्टेंबर २०२३
वेळ : दुपारी, ०१ वाजून ०६ मि.
मनापासून पूर्ण-रिक्त होणं म्हणजे नेमकं काय ?
संपूर्ण निचरा करणं, जे काही त्यात साचलंय !
कुणा वाटेल हात्तिच्या त्यात काय एवढंच ना ?
चुटकीसरशी होतं की नाही पाहा, बघता बघता
खूप नंतर समजतं जसं घराला रिकामं करताना,
डोकं फिरतं, जमवलेला प्रचंड पसारा बघताना !
गोळा करुन मनाच्या काना-कोपऱ्यात भरलेला
निरुपयोगी कचरा वर्षानुवर्ष धूळ खात पडलेला
त्याची विल्हेवाट लावणं वाटतं तितकं सोपं नव्हे
हे कुणा येर्या-गबाळ्याचं काम तर नक्कीच नव्हे
माझं-माझं हवं-हवं, हव्यासानं उभारलेला संसार
त्यातच पूर्णतः गुरफटलेलं तन-मन-धन अपरंपार
या “मायेचा” त्याग करुन, मनानं पुरतं विरक्त होणं
हे तर मध-पोळ्यातून राणी-माशीला बाहेर काढणं
मन एवढं कोडगं की क्षणार्धात कवटाळूनच बसतं,
ते अजिबात विचलित होऊ न देणं, कठीण असतं
जे प्राजक्ताचा वृक्ष दररोज सहजपणे करु शकतो,
सुंदर-नाजुकशा-फुलांचा फुलोरा रोजच फुलवतो
अन् विरक्त वृत्तीने रोजच्या-रोज तो धरेला अर्पितो
ना राग-ना लोभ ना मोह सदा तो निर्विकार असतो
ही अलिप्तता महत्त्वाची, ही सहजताही महत्त्वाची
पण तिला अंगिकारण्याची वृत्ती त्याहून महत्त्वाची !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply