कविता – 🌷’ भाग्याचा ठेवा ‘. दिनांक – ३ जानेवारी २०२४

कविता – 🌷’ भाग्याचा ठेवा ‘

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
दिनांक – ३ जानेवारी २०२४
वेळ – दुपारी, ३ वाजून २३ मि.

खरोखरच हा भाग्याचा केवढा मोठा आहे ठेवा …
इतका की इतरांना वाटू शकतो अशा भाग्यशालींचा हेवा…!

सदैव डोक्याचे, शरीराचे, मनाचे सगळे विभाग शाबूत व कार्यक्षम असणे ही फार मोठी गोष्ट आहे…
वय वाढूनही विस्मृती न होणे, सर्व गोष्टी चांगल्या लक्षात ठेवता येणे …
दृष्टी आणि श्रवणशक्ती अगदी शंभर जरी टक्के नाही…
तरी किमान बिना-तक्रार, कुरबुरीविना, दैनंदिन जीवनात कार्यक्षम राहण्या एवढी शाबूत असणे …
थोडक्यात काय तर नाकावर चष्मा आणि कानात यंत्र लावण्याची गरजच न भासणे …
व्यवस्थितपणे चावायला आणि थोडी शोभेला-हसायला, दंतपंक्तींची उपस्थिती असणे अत्यंत महत्त्वाचे…
बत्तीशी शाबूत असणे, ऊसाची कांडी जमो न जमो, निदान चिक्की, तीळगुळाचे लाडू खाणे …
घ्राणेंद्रिय कार्यशील असून, मस्त मोगरा, अनंत, बकुळी आदींच्या सुगंधाचा मनसोक्त आस्वाद घेता येणे…
या अन् अशा अनेकानेक अतिशय सामान्य पण तरीही अक्षरशः स्वर्गीय सुखांच्या वर्षावात चिंब होता यावे…

कसलीही (तब्येतीची वा पैशाची) फिकीर न करता, गोड पक्वान्नांची माधुरी चाखून सण साजरा करता येणे…
गोळ्या-चॉकोलेट पासून अगदी चिंचा, बोरं, पेरू, करवंदांपासून झाडून सर्व फळांचा रसास्वाद घेतां येणे…
न थरथरता लिखाणादी कामं करु शकणे-तसेच लॅपटॉप, संगणक, आय-पॅड/टॅबलेट, मोबाईल फोन्स हाताळणे-वापरणे…
एकसमान सही करु शकणे, हळूहळू का होईना पाय-या चढू-उतरू शकणे … पोहणे, हाईकींग, डोंगर चढू-उतरु शकणे…
थोडक्यात काय तर आप्त-स्वकीयांवर भारिभूत न होता, शारिरीक -मानसिक-आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असणे …
वयापरत्वे सौंदर्य थोडं निस्तेज झालं तरी, डोक्यावर केशसंभार शाबूत असणे … माथ्यावरची कौलं उडून न जाणे…

पोटा-पुरते का होईना व्यक्तिगत उत्पन्न असणे, कर्ज-मुक्त-चिंतामुक्त-व्याधी-मुक्त जीवन असणे…
ज्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या ती मुलं-बाळं, बरोबर असणे-किमान त्यांचा निकटचा सहवास लाभणे…
नातवंडां-पतवंडांचं लाड-कोड-कौतुक करुन त्या भाबड्या विश्वात पुन्हा एकदा लहान होऊन रमणे…
” विश्वचि माझे घर “यानुसार हिंडत्या-फिरत्या वयात योजना-बध्द-रित्या जमेल तसे जमेल तेथे फिरुन येऊ शकणे…
सातत्याने लहान-मोठ्या सहलीत सहभागी होणे … देशाटन करणे… तीर्थाटन करणे-राहून गेलेले छंद जोपासणे…

दरवर्षी ‘रियुनियन’ आयोजित करुन, शाळा-कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासात जुन्या आठवणींना उजाळा देणे…
नोकरी-धंद्यातील सहकारींच्या संपर्कात राहणे, अधूनमधून सर्वांना भेटून जुन्या स्नेहाला जिवंत ठेवणे…
जवळच्या नातेवाईकांची आवर्जून चौकशी करुन, काही मदत हवी असल्यास, ती करण्याची तयारी दर्शविणे…
घरच्यांशी सुसंवाद साधून, त्यांची विचारपूस करणे…
सतत नवं काहीतरी शिकत राहणे … आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे…

थोडक्यात काय तर स्वतः आनंदी राहून, जमेल तेवढा आनंद भोवताली सर्वांना न मागता देणे…
कारण जे जे आणि जसं जसं आपण वागतो-बोलतो-सत्कर्म-सत्कार्य करतो, 
तेच कैक पटीने वृद्धिंगत होऊन, फिरुन साभार आपल्याचकडे दाही दिशांनी येते…
मग ते सत्कार्यांचे-सत्कर्मांचे चांगले फलीत ‌‌असो वा दुराचाराने-दुर्जनांची केलेली साथ-संगत असो…
सुक्ष्मातिसूक्ष्म घटनांची-कृत्यांची अचूक नोंद होते अन् त्यानुसार सुखी किंवा शापित आयुष्य भोगावे लागणे…
गरजवंताला मदतीचा हात दिल्याने, पुण्य-कर्म-केल्याने शापित-जीवनही थोडंसं सुसह्य होऊ शकते…

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆






























Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!