कविता : 🌷’ खरी श्रीमंती ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : रविवार, ५ मार्च २०२३
वेळ : ११ वाजून २२ मि.
“अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने ?” अशी स्थिती,
अन् तरीही “चमडी देगा पर दमडी नहीं देगा” अशी कद्रू-कृपण प्रवृत्ती !
अशावेळी खिसे गरम, तिजोरी भक्कम, नव्या-कोर्या गाड्यांची चमचम
बंगले, नवं कोरं पेंट-हाऊस, प्रतिष्ठित स्पोर्ट्स क्लबातून खास आमंत्रण !
इतकी सगळी ‘माया’ जमवल्यावरही, अंतरंगात मात्र ‘ठणठण गोपाळ’ !
स्वार्था-पलीकडे जाऊन कोणासाठी, अंगाला घस लावून कशाला घ्याल ?
भरमसाठ पैसे फेकूनही कोणी ‘मनाची श्रीमंती’ विकत घेऊच शकत नाही,
उपजत नसल्यास, परिस्थितीनं डोळ्यात अंजन घातल्याविना ती येत नाही
एकदा का डोळ्यांवरची झापडं उतरली की मग तो खराखुरा भानावर येतो
आजवरच्या चुकांनी पश्चात्ताप-दग्ध होऊन, मनोमन चांगलाच खजील होतो
‘खरी श्रीमंती’ ही मनाच्या मोठेपणाची-उदारतेची, सदा माणुसकी जपणारी
स्वकष्टांची पर्वा न करता, नि:स्वार्थभावाने मदतीचा हात नित्य पुढे करणारी
‘गर्भश्रीमंती’ म्हणजे गर्भात असल्यापासूनचा संस्कार, मनाच्या मोठेपणाचा
मुबलक घरंदाजपणा अन् पूर्ण अभाव स्वार्थी, कोत्या ‘कूप-मंडूक-वृत्तींचा’!
प्रत्यक्षात गर्भ-श्रीमंतीचा, खिशातल्या खळखळाटाशी सुतराम संबंध नसतो !
असं असूनही गरजवंताला मदत करताना त्यांचा हात कधी आखडत नसतो
अत्यंत तुरळक, लाखांत एखाद्या व्यक्तीलाच हे वरदान लाभलेलं आढळतं,
अन्यथा करोडोंच्या संख्येने जगात असतात स्वार्थांध-अनुदार ‘बेगडी’ श्रीमंत !
आयुष्यात प्रगती-पथावर पुढे-पुढे जाणं हे अजिबात अयोग्य अथवा गैर नव्हे,
पण स्वेच्छापूर्ती करताना स्वार्थांधतेनं अन्य लोकांवर अन्याय होता कामा नये
नि:स्वार्थीपणे इतकी खबरदारी व जमेल-तेव्हा-जमेल-तसं जर केलं साहाय्य,
पोटा-पुरता आत्मिक आनंद व इवलासा परमार्थ सुध्दा हमखास होईल साध्यं !
पोटा-पुरता आंतरिक आनंद व इवलासा परमार्थ सुध्दा हमखास होईल साध्यं !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply