कविता :🌷 ” पडसाद “


कविता - 🌷 " पडसाद "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

अवचित गढूळ वातावरणात आभाळ बरसले,
अवकाळी पाऊस पडूनही सारे विश्व आनंदले...

व्याकूळ स्मृतींच्या भव-यात संदेह भिरभिरला,
इवलासा जीव घाबरून सैर-भैर पळत सुटला...

थेंब थेंब मनांतरी, तरल स्पंदनांनी झंकारलेले,
ते विलक्षण दृश्यही जणू काही झाले मंतरलेले...

पंचेंद्रियांच्या आकलना-पलिकडचे ते निरागस,
भाव-भावनांचे सप्तरंगी स्वप्नवत-कोमल-विश्व...

मूक संमतीच्या नुसत्या कल्पनेचा, आविष्कार...
शब्दातीत तरलतम, निरामय भावविश्व साकार...

शब्दाळलेले व्याकूळ मन एक-टक तंद्री लावून,
क्षितिजापलिकडील विश्व, सूर्यदेवाने झाकोळून...

नेत्र-पापण्यातून झरझरणारी व्याकूळता पाहून,
काही न बोलता घेतली त्याने ती अलगद टिपून...

पहाट-वेळी जसे दवबिंदू जमतात पाना-पानांवर,
क्षणार्धात चमकते आनंदाश्रु थिजले पापण्यांवर...

त्या संवेदनांनी भारावून नयन मिटले आपणहून,
अन् सुखाच्या हिंदोळ्यावर डोलू लागले सुखावून...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!