कविता : ज्ञानाचा द्रोण
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
सुख-दु:खाचं असतं हे विचित्र आणि गुंतागुंतीचं कोडं,
जितकं सोडवत जावं अधिकच गुंतत जाऊ थोडं-थोडं !
मानवी-जीवनात एका क्षणी जे वाटतं अत्यंत हवंहवंसं,
तेच दुसऱ्या क्षणी वीट येऊन वाटतं अगदी नकोनकोसं !
आयुष्यात ऊन-पावसाचा हा सतत चालायचाच खेळ
सरळ-धोपटपणे, कसा जमवावा बरं सगळ्याचा मेळ ?
दिसतात प्रलोभनं इतकी, की माणूस गुरफटतच जातो
त्यानंतर पाठोपाठच दु:खांच्या फटक्यांनीही तो पोळतो !
कधी-काळी होणारा आनंदाचा असा सुखदायी-वर्षाव,
तर कधी अचानक उन्मळून टाकतो नियतीचा क्रूर घाव !
नव-बाळाच्या आगमनानं कुटुंबात फुलतं जणू नंदनवन
पण ह्दय-विकाराच्या झटक्यानं होतं आजोबांचं निधन !
आनंदी-दु:खीकष्टी होणं, दोन्ही-बाजू या-एकाच-नाण्याच्या
त्यांचा उगम, सात-कप्प्यांच्या-गाभाऱ्यातच होतो मनाच्या !
प्रश्न पडतोच 'नियती-नियती' म्हणजे नक्की आहे कोण?
हे शोधणं ज्याला जमेल, त्यालाच लाभेल ज्ञानाचा द्रोण !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply