कविता - 🌷 " तारी राम-नाम-स्मरण "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १७ एप्रिल २०२४

नुसतं राम-राम म्हटल्याने पापांचे डोंगर नष्ट होती
ही थेट वाल्या कोळी पासूनच येते सर्वांना प्रचिती
पाप केलं मनानं, शरीरानं, हातांनी वा विचारांनी
कसंही केलं तरी ते जमा होतंच जातं, अंतर्यामी
वाल्या-कोळ्यानी केली पापं, पोटा-पाण्यासाठी
माणूस करतो, कुटुंबासाठी-प्रेमापोटी-मजेसाठी
पापांची वारूळंच्या-वारूळं उभी करतो, अंतरी
जेव्हा जागृक होतो, चिडतो-पस्तावतो स्वतःवरी
आयुष्यात जेव्हा-केव्हा त्याचे अंत:चक्षू उघडतात
सपशेल उपरती होऊन, तीच होते नव्याने सुरवात
अगदी प्रथम तर कोणीही " राम राम" म्हणायला,
मनं-बुद्धी आणि जीभही तयार नसतेच वळायला
"राम-नाम"घेऊन वाल्याकोळी प्रमाणे नाम-जपलं
तर सन्मार्गावरचं पहिलं-वहिलं पाऊल होऊ शकतं
अर्थात कधीही "वाम-मार्ग" सोडणं, सोपं नसतंच
अट्टाहासाने ठरवलं,"मरा-मरा" विपरीत म्हणायचं
मग हळूहळू सुरु होतं, पापांच्या राशींचं वितळंणं,
तळमळ पारखून विधाता करतो पुढील मार्ग-दर्शन
अंतर्स्थित गुरु करतो "प्रत्येक-वाल्याचं" रूपांतरण,
चिकाटीने, अथक प्रयत्नांती तारी राम-नाम-स्मरण
🌷@तिलोत्तमा विजय लेले🙏🕉️🔆
Leave a Reply