
कविता 🌷 " नतमस्तक "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
आसमंत सुखद-सुंदर आहे
निळे-निळे पाणी व आभाळ आहे
हिरवागार निसर्ग आहे
प्रसन्नतेचा शिडकावा आहे
एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।१।।
हाताशी मुबलक वेळ आहे
खेळवायला दोन नातवंडं आहेत
हात-पाय-डोकं-दृष्टी शाबूत आहे
कुडीमध्ये पंच-प्राण आहेत
एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।२।।
तना-मनात संगीत आहे...
गळ्यात गाणं गुणगुणत आहे
कानात स्वरांची मेजवानी आहे
हृदयात शब्दांचं वरदान आहे
एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।३।।
जवळपास बागा आहेत
हिरवीकंच वनराई आहे...
सृष्टी-सौंदर्य निथळत आहे
लहान मुलं बागडत आहेत
एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।४।।
सुग्रास पौष्टिक आहार आहे
जगभरची रसाळ फळं आहेत
मनात-पोटात भूक आहे...
खाण्या-पिण्याची लयलूट आहे
एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।५।।
पोटची दोन-दोन मुलं आहेत
ओळखी-पाळखीची मंडळी आहे
एका फोन-कॉलच्या अंतरात आहेत
स्मरणशक्ती ही शाबूत आहे...
एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।६।।
नसानसात अध्यात्म आहे
श्वासागणिक नाम आहे...
कलात्मकतेचं लेणं आहे
सुदृढ-निकोप शरिर आहे...
एवढंच खरं तर पुरेसं आहे...।।७।।
ईश्वराचा वास आहे-भास आहे
परमेश्वर-कृपेची आस आहे
सृष्टीदेवीची साक्ष आहे-साथ आहे
ॐकाराची स्पंदने आहेत
एवढंच खरोखर पुरेसं आहे...।।८।।
एवढंच खरोखर पुरेसं आहे...
म्हणून कायम नतमस्तक आहे🙏
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















