कविता :🌷’ शाश्वत आनंद ‘


कविता :🌷' शाश्वत आनंद '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, ३ जुलै २०२३

जन्मा-आधीपासून शिक्षण सुरु होतं
पुढे अनंत काळा-पर्यंत सुरुच रहातं !
शिकविणारे सगळे गुरु-जन, सद्गुरु
जन्मदाते-माता-पिता हेच आद्य-गुरु !

आयुष्यभरात अगणित होतात सद्गुरु
व्यक्ती-प्राणी-पुस्तकं-निसर्ग वा वास्तु
सद्गुरु हे शिष्यांसाठी जणू 'कल्पतरु'
ज्ञानदान-यज्ञ व आशिर्वचन 'तथास्तु' !

सिध्दपदासाठी दत्तगुरुंनी २४ गुरु केले
प्रत्येक गुरुच्या उत्तम-गुणांचे ग्रहण केले
नीर-क्षीर-विवेकाने वाढते गुण-ग्राहकता,
व्यक्तिविकास होऊन वृध्दिंगत गुणवत्ता !

काही अंतस्थ-हेतूने, कधी नाईलाजाने...
'एका'चा गुरु होणे द्रोणाचार्यांनी टाळले
पण निराश न होता, चिकाटीने-जिद्दीने...
एकलव्य-श्रेष्ठ-धनुर्धर-झाला, निर्धाराने !

परशुरामांसम-परमगुरु मिळवण्यासाठी,
शूर-वीर कर्णाने, लपविल्या काही गोष्टी
मिळवूनही ज्ञान-युद्ध-कौशल्य-रणनीती,
खोटेपणामुळेच गुरु-शाप मिळाला अंती !

सांदिपनी ऋषींच्या गुरुकुल-आश्रमात,
श्रीकृष्ण-बलराम दोघेही झाले निष्णात
अध्ययनाने त्यांनी, ज्ञान केले आत्मसात
शंखासुर-वध करुन वाचविले गुरु-पुत्रास

गुरु-धौम्य-ऋषींच्या, आज्ञा पालनासाठी
रात्री बांध बनून आडवा राहीला आरुणी !
गुरु-चाणक्य यांची-प्रतिज्ञा-पूर्ण करण्यात,
चंद्रगुप्त-मौर्याने स्वआयुष्य लावले पणास

ज्यास सद्गुरु लाभला ते खरेच भाग्यवंत
आत्मज्ञान-प्राप्ती, सहवासात संत-महंत !
गुरु-मार्गदर्शनाने जीवन होई पूर्ण-सफल,
शाश्वत-आनंद करी तन-मन-चित्त निर्मल !


@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!