कविता – 🌷 ” कशी होऊ गं उतराई “

कविता - 🌷 " कशी होऊ गं उतराई "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे माझी आई
कोणत्याही विशेषणांनी तिचं अचूक वर्णन, होणार नाही

नाकी-डोळी-नीटस-पायांपर्यंत लांब व घनदाट केशसंभार
सोज्वळरुप-शेलाटा-बांधा-बुद्धिमत्तेचं तेज-थोर कर्तबगार

भाळी कुंकु-शांत-तेजस्वी डोळे, बघणा-याचा वेध घेणार
कानी मोत्यांच्या कुड्या, केसांचा अंबाडा नजरेत भरणार

अत्यंत रसिक, वाचनाचा व्यासंग-आधुनिक विचार-सरणी
आवड-सर्व कलांची-संगीत-नाट्यपदे-नाटक-सिनेमा-गाणी

मुलांवर,घारीसम-तीक्ष्ण-दृष्टी-वेळेनुरुप-लाड-शिस्त-संतुलन
"नाही"म्हटलं-की-काळ्या-कातळावरची-रेघ,अशक्य बदलणं

स्वाभिमानी, कष्टाळू, जिद्द अशी की इकडची दुनिया तिकडे
आठवडाभर उपवास करुनही सदा उत्साही, शरिराने-मनाने

ना कधी चिडचिड, ना रागावून-घालून-पाडून बोलणं-वागणं
पहाटे उठून सगळी कामं उरकणं,मनोमन अखंड नामस्मरणं

अगदी शाळेपासून प्रत्येक वार्षिक निकालाच्या दिवशी, कायम
निकालपत्र आणेतो उभीच असे गॅलरीत चातकासम वाट बघत

जन्मत:, तावून-सुलाखूनही मनात कडवटपणा जराही नव्हता
तिच्या सावत्र-आईंनी दिलेला त्रास सहन केला-तक्रार न करता

लहान-वयात लग्न-मग-संसार-मुलं-बाळं, पण डगमगली नाही
मिरजेत येऊन वाणी-सामानाचं दुकान थाटलं,त्या जुन्या काळी

जन्मजात दूरदृष्टी व खंबीरपणा अंगीं होता, अत्यंत धोरणी होती
मुलं-बाळं-घर-संसार सुरळीत ठेवण्याची, खबरदारी घेतली होती

गाई-म्हशींचं संगोपन-घरोघरी दुध-पुरवठ्याचा व्यवसायही केला
त्यामुळे दूध-दुभतं,घरगुती सामानाचा तुटवडा कधी नाही पडला

प्रत्येक मुला-मुलीच्या शिक्षणात बरोबरीने समरसून लक्ष घातले
काही चुकत असल्यास तिने वेळीच टोकले-समजावून सांगितले

ती एकपाठी होती अन् तिचं वाचन-मनन-पठण-खूप-दांडगं होतं
भगवद्गीता-ज्ञानेश्वरी-तुकाराम-गाथा-एकनाथी भागवत पाठ होतं

अनेकानेक स्तोत्रं-मनाचे-श्लोक-पोथ्या तिला तोंडपाठ येत असत
अचूक-उच्चारांनी शिकवी-गणपती-मारुती-रामरक्षादी कैक स्तोत्रं

वाचन-सावरकरांचं-स्वामी समर्थांचं लिखित-अध्यात्मिक साहित्य
आश्चर्य म्हणजे दिवसभर राब-राब-राबूनही, ती नेहमी प्रसन्न चित्त

माझ्यासकट सर्वांनी तिला अध्यात्माविषयी प्रश्न विचारुन भंडावले
जराही न चिडता,शांतपणे प्रत्येकाच्या सा-या शंकांचे निरसन केले

अध्यात्मिक ज्ञानार्जन-सततचं-नामस्मरण यांनी कैक-सिध्दि-प्राप्त
वाचा-सिध्दिमुळे तिने मनापासून बोललेले शब्द-वचन-होतसे सत्य

ध्यानस्थ होऊन,कुटुंबीयांवर येणारी अरिष्टं पूर्ण परतवून लावायची
तिच्या या सिद्धिची, अनुभवान्ती पक्की खात्री पटली होती सर्वांची

आयुष्यभर सदा-सर्वदा आम्हांं सर्वांवर मायेची सावली केली तिने
आम्हांंवर बेतलेल्या संकटांना निकराने लढून परतवून लावले तिने

महाभयंकर घाव तिनं तिच्या उजव्या हातावर परस्पर झेलल्यामुळे,
रेल्वे-अपघाती मला साधं खरचटलं नाही, तिच्या सुरक्षाकवचामुळे

इतकं अघटित होऊनही ना ती डगमगली,ना कधी परावलंबी झाली
पालेभाजी चिरण्यापासून, पुरणपोळी करण्यापर्यंत सगळं करायची

पैही न घेता, ओळखी-पाळखीच्यांना संकटांतून बाहेर काढले तिने
ते-त्यांचे सगळेच कुटुंबीय वेळोवेळी तिचे मार्गदर्शन घेण्यास यायचे

प्रत्येक मुला-मुलीवर सुसंस्कारांचं, सद्विचार-सद्वर्तनाचं शिंपण केलं
शिक्षणाचं-अभ्यासाचं-स्वावलंबनाचं-महत्त्व, लहानपणीच बिंबविलं

जीवनात सर्व भावंडांनी जो टप्पा गाठला,त्याचं पूर्ण श्रेय तिला जातं
माझी ती आद्य-गुरु आहे, दिवस-रात्र प्रत्येक क्षणी तिचं स्मरण होतं

खूप पूर्वीच तिनं निक्षून सांगितलं होतं,तिचा "पुन-र्जन्म होणार नाही"
त्यामुळे श्राद्ध-पक्ष-पितृ-पंधरवडा करण्याच्या फंदात पडायचे नाही

ती 'इच्छा-मरणी' होती- स्थूल-शरिर त्यागून जेव्हा तिने देह ठेविला,
महिनाही तोच, तारिखही तीच, जेव्हा आमच्या काकांनी देह ठेवला

दु:खद बातमी ऐकून,अत्यंत जड अंतःकरणाने जात होतो वाशीला,
तिने-भालप्रदेशी-आज्ञा-चक्रात-सूक्ष्मरुपे, तत्क्षणी दर्शन-दिले-मला

आजही डोळे मिटता, तिचं सूक्ष्म-रुपातील-वास्तव्य मन-प्रसन्न करी
तिचा शब्द-न्-शब्द अंत:करणात, हृदयाच्या गाभाऱ्यात-गुंजत राही

तिच्या पोटी जन्म मिळाला,फळास आली अगणित जन्मांची पुण्याई
हे आद्य-गुरु-माऊली, न कळे या पामर जीवा, कशी होऊ गं उतराई

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!