कविता:🌷”शुभंकरी-कालरात्री”


कविता : 🌷 " शुभंकरी-कालरात्री "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

रात्री क्लेशांचा निचरा होऊन, सोनेरी ही सकाळ…
"कालरात्री" देवीला, प्रेम-पूर्वक समर्पित सर्वकाळ…

दुर्गेचं हे सातवं स्वरूप, उंच-निंच-महाकाय-भव्य...
काळा-कभिन्न वर्ण, परि आतून ज्योतीर्मय-दिव्य…

दुष्टांचे परिपत्य हे एकमेव लक्ष्य जणूकाही एकलव्य
वध करी खलांचा-खलवृत्तींचा, चोख बजावी कर्तव्य...

देवी "कालरात्री" चतुर्भुजा देवी, होते रात्रीच सक्रिय...
निप्पात करून टाकते दैत्य-राक्षसांचा, जे जे निर्दय...

गर्दभ तिचे वाहन, जे तिजला असे अत्यंतिक प्रिय...
पति-परमेश्वर शिवशंकर-महादेव, हे तिचे प्राण-प्रिय...

देवी-पूजनाने सरू शकतील सर्वच प्रकारच्या बाधा...
नकारात्मक व्यक्तिसुध्दा बनेल अत्यंत सरळ-साधा...

"शुभंकरी" नाव देवीचे पडले, कारण ती स्वयंसिद्धा...
संपूर्ण रक्त प्राषून वध केला, तिने हरविले "रक्तबीजा"

दुर्गामातेचा असे हा सातवा अवतार, आदि-पराशक्ति...
गळ्यात मुंडमाळा, महा-भयंकर रुद्रावतार धारिते ती…

काली, "काल" म्हणजेच शिव, त्याचीच पत्नी "काली"
महाकाली, चामुंडा, चंडी, भैरवी उग्ररूप विनाशकारी…

काळ म्हणजे मृत्यू, अज्ञानाचा अंधकार नष्ट करणारी...
"काली," सर्व असुरांचा कर्दनकाळ, म्हणूनी कालरात्री…

देवलोकी मुजोर दानवांस केले अर्धमेले, टाकून फुत्कार...
यमसदनास पाठविले रौद्रीने, प्रत्येकाला करूनी बेजार...

पूजनअर्चनसमय रात्री, साधकाचे ध्यान सहस्रार चक्री...
देऊन सिद्धी, भक्तांना निर्भय करीते-भीतीपासून मुक्ति...

भक्तांच्या चिंतांचे हरण, अज्ञानाचा संपूर्ण विनाश करते...
जीवन उजळून, संकटांचा सामना करण्यासही शिकविते...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!