कविता : 🌷 ” अचूक हिशोब “


कविता : 🌷 " अचूक हिशोब "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

झरझर वाहणारा झरा म्हणजे काळ
अनंत, अफाट, निरंतर जीवन-प्रवाह...
घट्ट-मुठीतील रेतीसम निसटू न जावा...
या-जन्मी मिळालेल्या मोजक्या वर्षांचा,
सूज्ञपणे-विचारांती, वापर व्हायला हवा...

म्हणूनच अचूक हिशोब ठेवायला हवा

जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता बाळगून,
आयुष्यात दरेक क्षणाला आदर्श राहून,
प्रेम-माया-आदराची देवाणघेवाण करुन,
पाय-प्रगती पथावर, भक्कमपणे रोवून...
हा मनुष्य-जन्म, सफल करायला हवा...

म्हणूनच अचूक हिशोब ठेवायला हवा

जोपासलेला स्नेहभाव वृद्धिंगत करून,
सच्च्या दिलाने जीवनात मैत्री निभावून,
गैरसमजाने निर्माण झालेल्या शत्रूत्वाला,
सलोख्याने मैत्रीत पुनःपरावर्तित करण्या,
पुरेसा-वेळ, चांगुलपणा दाखवायला हवा...

म्हणूनच अचूक हिशोब ठेवायलाच हवा

कलीयुगात कुणी-सद्गुणांचा-पुतळा-नसते...
प्रत्येकच व्यक्ती गुण-दोषांची खाण असते,
काही कमी, काही अधिक वा उणे असते...
गुण संख्या वाढवून, अवगुण सुधारण्यास...
शंभर टक्के मन:पूर्वक यत्न व्हायला हवा...

म्हणूनच अचूक हिशोब ठेवायलाच हवा...

प्रत्येक दिवस असे उजेडाचा-काळोखाचा...
मना-मनातील-अंधकार नष्ट करायला हवा
माणुसकीचा ओलावा, टिकवायलाच हवा...
त्यासाठी अध्यात्मिक पायाच मजबूत हवा...
आजन्म क्षणन्क्षण सत्कारणी लावला जावा...

म्हणूनच अचूक हिशोब ठेवायलाच हवा...
म्हणूनच अचूक हिशोब ठेवायलाच हवा...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!