कविता : 🌷 " आनंद-फुले "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
समुद्राच्या काठावर, रेतीत बांधले किल्ले...
मनाच्या खिडकीतून हळूच कुणी डोकावले...
मऊ-मऊ वाळूमध्ये, मोठ्ठे घबाड सापडले...
शुभ्र पांढरे, रंगी-बेरंगी शंख आणि शिंपले...
एक-एक करुन सारे, एकटक पाहू लागले...
त्यांच्या बरोबर खेळण्यात मन रमूनच गेले...
छोटे-मोठे शिंपले आणि शंख-इवले-इवले,
पण त्यांच्यामधले जीव मात्र निघून गेलेले...
पाण्याच्या लाटां-बरोबरच वाहून आलेले...
रेतीतच सागर-किना-यावर लपून बसलेले...
हां हां म्हणतां-म्हणतां संध्याकाळच झाली
दरिया किनारी लाटांची भरती सुरू झाली...
पाणी पुढे पुढे सरकत जणू खेळायला आले...
हुतूतूचा खेळ-खेळून, किल्लेच काबीज केले...
जीव लहान-सहान असो वा प्रचंड महाकाय...
महत्वाचे हे, त्याने आयुष्यात केले काय काय...
आयुष्य लांब-लचक असो किंवा क्षणभराचे...
किती दिला-घेतला आनंद, अंती हे महत्त्वाचे...
म्हणून, आपापल्या जीवनातील क्षण-न्-क्षण...
आपण व्यतीत करुया, " आनंद-फुले " वेचून...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply