कविता – 🌷 ” अद्वितीय जोड “

कविता - 🌷 " अद्वितीय जोड "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

नभात कोणता असे हा तारा ?
खुणावतो, चमचम करी बावरा
धावे अकारणच मन नदी-तीरा,
मोह-मायेचा जणू खेळ हा सारा...

निसर्गातिल सूक्ष्मातिसूक्ष्म नाद
सदा देती हळुवारसा प्रतिसाद
शांत आसमन्ती होई चलबिचल
पक्षीगणांची मधाळशी किलबिल...

झाडा-झाडातून वारा येई वाजवीत शीळ
कोणी टाकली, चमकत्या आभाळी नीळ ?
नकळत मनोमनी कोणी ही घातली भूल ?
कोण जाणे राधेला असं कसं लागंलं खूळ ?

ऐकूनी श्री हरिची मधुर मुरली,
प्रेम-वेडी राधा घर-दार विसरली...
जणू तहान-भूकही सारी सरली
नकळत अलगद देहभान हरपली...

सहज अवखळ राधा-राधा-राधा, "धारा-धारा-धारा" बनली...

जुळले-जुळलेसे वाटती, नाजूक कोमल धागे...
कोण असे तो वीणकर, काहीच कसे न उमगे ?
हा भास, स्वप्न कीं सत्य, का ना कुणी मज सांगे ?
बिंब दिसे प्रति-बिंबा, चाहूल कशी मग न लगे ?

कातरवेळ झाली अन् लागते अनावर ओढ ...
जणू वेडया राधेची, खट्याळ कान्हा काढी खोड
सांज-लालीमा पसरुनी, गाली दिसतसे गोड ...
द्वैत आणि अद्वैताची, अद्वितीय अशी ही जोड

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!