कविता : 🌷 ‘ खरं धन ‘ तारिख : शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४

कविता : 🌷 ‘ खरं धन ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४
वेळ : ५ वाजून २२ मि.

मनुष्य-जीवन किती क्षुल्लक-क्षणभंगुर …
एका बाजूला चालतं-बोलतं-सजीव तर,
दुसऱ्या क्षणी नडतो, मृत्युचा घाला-क्रूर …
माहित नसतं काय घडणार, भविष्यात ?
काय काय वाढून ठेवले आहे, नशिबात …
स्वतःच्या गुर्मीत बेधुंद जगतो वर्तमानात …

जन्म झाल्यापासूनच दर क्षणा-क्षणाला …
हसत-हसत जवळ घेत असतो मरणाला …
अज्ञानामुळे उपभोगू शकतो, तो सुखाला …

विश्वाच्या अवाढव्य पसार्यातील एक जीव …
ज्याच्या अज्ञानावर, विधात्याला येते कींव …
क्षणार्धात करु शकतो निर्जीवास, सजीव …

सुखांध होत, गोळा करत सुटतो मालमत्ता …
अखेरीस काय नेमकं न्हेणार, नसतो पत्ता …
आजतागायत मृत्युवर नसे कोणाची सत्ता …

जन्मा येता, मोजक्याच श्वासांची शिदोरी …
बंद मुठीत घट्ट धरलेली, आयुष्याची दोरी …
स्वेच्छेने रंगवण्यासाठी, जीवन-वही कोरी …

धडधाकट शरीरयष्टी अन् संवेदनशील मन …
ईश्वरीय वरद-हस्ताने लाभलेलं, हे खरं धन …
सत्कर्म-सत्कार्य-परोपकारात रमावं तनमन …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆





















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!