कविता 🌷’ मातृ-पितृ-प्रेम ‘

कविता :🌷 ‘ मातृ-पितृ-प्रेम ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : रविवार, १८ जून २०२३
वेळ : ७ वाजून २५ मि.

मातृप्रेमाचा उदो-उदो होतो जगात सर्वत्र 
त्यात गैर किंवा चुकीचं काहीच नाही बरं,
नवजीवाचा जन्म म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म
पण पितृपदाचं महत्त्व खूप मोठं हेही खरं !

स्त्री-पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू
दोघांच्या स्थायी-स्वभाव-विशेषात भिन्नता
एक बाह्यतः तटस्थ पण अंत:करणानं मृदू !
दूजी वात्सल्य-मूर्ती पण शिस्तप्रिय-दृढता !

दोहोंचा उद्देश एक पण दृष्टि-कोन वेगवेगळा 
नवागत-सुसंस्कारित-जबाबदार-व्यक्ती होणं,
आईचा भर, शरीराचं-मनाचं-आरोग्य जपणं
अपत्या-बद्दल पित्याचा कल जरासा निराळा 

पित्याचा भर सूर्य नमस्कारादि कसरती करणं,
मनाने-शरिराने निर्भय-शिस्तबध्द-खंबीर होणं,
कोणत्याही प्रसंगाला कच न खाता, तोंड देणं,
वेळीच निर्णय घेऊन तो प्रयत्न पूर्वक निभावणं !

लाडकोड दोघंही करतात, दोघांची पध्दत वेगळी
खाण्या-पिण्याचे-नव्या-कपड्यांचे-लाड आईचेच
लांब-सहल-सायकल-स्कुटर-बाईकसाठी बाबाच
छोटा-खर्च-आईकडून, बाबांकडून अपेक्षा मोठ्ठी !

आई-बाबा दोघांचं महत्त्व-अनन्यसाधारण-पवित्र,
दोहोंच्या असण्यानंच त्या-त्या घराचं होतं तीर्थक्षेत्र !
जेव्हा सत्वर पृथ्वी-प्रदक्षिणेचं दिलेलं होतं आव्हान,
शिवपार्वती-प्रदक्षिणेनंच-गणेशास अग्र-पूजेचा-मान !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆









Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!