कविता : 🌷’ अंतर्यामी कोरलेले क्षण ‘  


कविता : 🌷' अंतर्यामी कोरलेले क्षण '             
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले                     

बांधेसूद यष्टी,नाकी-डोळी-नीटस, अत्यंत सरळ मनाचा
सगळ्या भावांमध्ये तिसरा क्रमांक आहे सुरेश अण्णाचा

किशोर वयात भरपूर व्यायाम करुन शरीर मजबूत केलं
मला व लामूला दोन हातांवर लटकवून, गरगर फिरवलं

अशी सर्कस करताना आम्हाला खूपच मज्जा वाटायची
म्हणून, त्याला मस्का मारुन-मर्जी सांभाळावी लागायची

आमच्यासाठी"ही-मॅन, सुपर-मॅन, बॅट-मॅन, स्पायडर-मॅन"
आमचा सुपर-हीरो-सुरेश अण्णा, हाच एकमेव "वन-मॅन"

मिरजेला विहिरीत पोहायला शिकवण्याचा त्याचा प्रयत्न
सायकल चालवितानाही तोच असायचा, माझा प्रशिक्षक

तासन्तास आरशासमोर उभा राहून केसांचा कोंबडा करी
बहुधा सुपरस्टार शम्मी कपूरच्या स्टाईलची, नक्कल करी

मी शेंडेफळ म्हणून नेहमी माझे तो विशेष लाड करायचा
मी सांगेन ते ते अगदी मोठी झाल्यावर सुध्दा तो ऐकायचा

आई बाहेर जाता, पुढाकार घेऊन सर्व साहित्य आणायचा
अंड्यांचे मस्त, खमंग ऑमलेट, चविष्ट चटणीही बनवायचा

एकूणच हाताला चव होती, छान खाद्य-पदार्थ बनवायचा
कोणी गंमतीत बलभीम-"बल्लव"असं म्हणून चिडवायचा

पत्ते-ब्रिज-झब्बू, ल्यूडो, साप-शिडी तल्लीनतेने खेळायचो
शनिवारी-रविवारी सगळे जमले की खूप धमाल करायचो

दरवर्षी भाऊबीजेला सगळे भाऊ जमून सण होई साजरा
रक्षाबंधनला मात्र सुरेश अण्णा मी येण्याची वाट बघायचा

सुशिलावहिनी आरतीपासूनची पूर्ण जय्यत तयारी ठेवायची
सुरेशअण्णाला राखी, ही जणू सर्व भावांची राखी असायची

गोरेगावात माझं माहेर आहे सुरेशअण्णाचं उन्नत नगरचं घर
गणपती असो वा इतर सण-वार, जोशातच साजरे करणारं

अगणित हळुवार क्षण जतन करुन जणू कोरलेले अंतर्यामी
एकही भाऊबीज जात नाही जेव्हा न भासे, अण्णाची कमी

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!