कविता – 🌷 ” मन-शक्ति “

कविता - 🌷 " मन-शक्ति "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

थोर ऋषी "कात्य"यांनी घोर तप करुन
दुर्गा-मातेला"पुत्री-रुपात" घेतले मागून
प्रसन्न देवीने जन्म घेतला वरदान म्हणून
“कात्यायनी”,कात्याऋषींची लेक म्हणून

दैत्य-महिषासुराने केले प्रचंड अत्याचार ...
तिन्ही लोकी माजविला होता, स्वैराचार ...
स्त्रियां-आबाल-वृध्दजनांमध्ये हांहांकार ...
कात्यायनीने दैत्यांचा केला संपूर्ण संहार ...

देवीने उग्ररूप घेतले, धडा शिकविण्यास
लीलया ठार केले-महाक्रूर माहिषासुरास
सिंहारूढ कात्यायनी-देवीच्या पराक्रमाने
माजलेल्या असुर-सेनेला केले भुईसपाट

देवीच्या उपासकांची षड्रिपुंपासून मुक्ति
भूलोकी अद्भुत भाग्योदयाची होते प्राप्ती
लाभे उत्तम स्वास्थ्य-नाम-किर्ती-श्रीमंती
कात्यायनी-साधनेने, इच्छित फलप्राप्ती

कात्यायनी-देवी मनाचे सामर्थ्य वाढविते,
"मन-शक्ति" नावानेही, ओळखली जाते
देवी सत्कर्म-सत्यधर्म-न्यायनिष्ठा पाळते
परम-भक्तांचे वांच्छित मनोरथ पूर्ण करते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏 🌅🕉

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!