कवितेचं नाव – 🌷” विठ्या “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २५ सप्टेंबर २०१७
वेळ – सायंकाळी ५ वाजून १८ मि.
गाडेकरवर असताना,एक मनीमाऊ होती
न पाळलेली असूनही, घराला धरुन होती
पहाटे,मागच्या दरवाज्याशी खर्-खर्-खर्
त्याचा परिणाम न झाल्यावर, गुर्-गुर्-गुर्
आतूनच आई, ” विठ्या, थांब थोडासा “
त्यावर बाहेरून, अगदि अस्पष्टंसं ” म्याँ “
कायम आश्चर्य, यांचा संवाद कसा साधतो ?
अन् मुक्या-प्राण्याला कसा बुवा समजतो ?!
थोड्या वेळाने, वाजायची दरवाजाची कडी
टक-टक ऐकून, “विठ्या, कळ काढ थोडी”
त्यावर मध्यम-लयीतलं मियाऊँ, होकारार्थी
दरवाज्याशी चाहूल ऐकून, “म्याऊँ” सर्वार्थी
कान उभे, टवकारून – डोळे अर्धोन्मिलीत
तिरप्या डोळ्यांनी आईच्या हालचाली टिपत
सरते शेवटी विठ्याची चिकाटी कामी आली
आईने दूध ओतून बशी त्याच्यासमोर ठेवली
पुढ्यात बशीत दूध बघूनही, स्वारी चुपचाप !
आईने, “विठ्या,आता कसली वाट पहातोस”
विठ्या आपला गप्प, एक नाही की दोन नाही
आईने चहाचा एक घोट घेताच, स्वारी खुलली
जिभल्या चाटत बशी रिक्त स्वच्छ-चकचकीत
मग तो बसला पंजाने तोंड-नाक-डोळे, पुशीत
असा हा विठ्या, जणू गेल्या जन्मीचा कोणी
माणसांपरि माणुसकी त्याची, असूनी प्राणी !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️ 🌅
Leave a Reply