कविता – 🌷 ” शौर्याची परमोच्च उंची “





कविता - 🌷 " शौर्याची परमोच्च उंची "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - 25 सप्टेंबर २०१६

अभिजात गुणांनी कला-जगतात, स्वयंभू नाव कमावणं...
कोणत्याही क्रिडा-क्षेत्रात नव किर्तीमान-स्थापित करणं...
आधुनिक स्थापत्य-शास्त्रात अनपेक्षित गरूड-झेप घेणं...
नानाविध अन्य-क्षेत्रात उंची गाठून, यशस्वी झंडे गाडणं...

नको नुसतीच वीरता ...
जोडीला तिच्या मानवता ...
उच्च पातळीची विचार-क्षमता ...
निष्णात नेमबाजाची एकाग्र-अचुकता ...
परिस्थितीशी झुंझण्याची तत्परता ...
प्रतिकूल स्थितीतही विजयश्रीला ...
खेचून आणण्याची जबरदस्त मानसिकता...

स्वामी-निष्ठेची उंची -
शिवाजीराजे पन्हाळगडाच्या वेढ्यातून, ...
शिताफीने निसटून,
सुरक्षित विशाळगडावर जाण्यास निघाले ...
एकट्यानी, मुठभर मावळ्यांसह घोड-खिंड लढवून,
शूर बाजी-प्रभू देशपांडेंनी, तलवारबाजी शर्थीने करून,
हजारो गनिमांना यमसदनी पाठविले ...

मातब्बर शत्रूला,
घोड-खिंडीतच तटवून ठेवले,
लढता-लढता शिर धडापासून वेगळे झाले ...
तरीही महाराज विशाळगडावर सुखरुप पोहचल्याची,
खूण म्हणून तीन तोफांची सलामी, ...
ऐकू येईपर्यंत त्या असामान्य महापराक्रमी, ...

लढवैयाने, स्वदेह धारातीर्थी पडू दिला नाही...
समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूलाही थोपविले, ...
शौर्याची, वचनपूर्तीची व स्वामी-निष्ठेची ही परमोच्च उंची ...
बाजीप्रभू आणि त्या निधड्या छातीच्या
मावळ्यांच्या अभूतपूर्व बलिदानाने,...
घोड-खिंड त्याक्षणी, "पावन-खिंड "बनली ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!