तारिख – बुधवार, २ ऑगस्ट २०१७
कविता – 🌷 ” स्वप्न-रंजन “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
एकदा स्वर्ग-लोकात झाली बरं एक गंमत
नवीन ठराव पास झाला, चक्कं सर्व-संमत !
या नंतर इहलोक सोडून जे जे येणार स्वर्गी,
त्यांना येण्यासाठी आधीच द्यावी लागेल वर्दी …
त्यानुसार लेखी वैयक्तिक अर्ज करावा लागेल,
प्रवेश-कराचा आगाऊ भरणाही करावा लागेल …
स्वर्गात आता ज्याला-त्याला यायला, मज्जाव
देवही संभ्रमात नक्की कुणा म्हणावं,”चलेजाव”…
सुशांत-सुंदरशा स्वर्गात, अनपेक्षित चल-बिचल
भक्तांवरही पाळी आली, सर्वत्र उडाली खळबळ
सारे प्रथम पूजनीय गणेशाकडे गार्हाणं घेऊन गेले
मंगलमूर्ती मोरयानी प्रथम सगळ्यांचे म्हणणे ऐकले
यावर जो उपाय निघेल, तो सर्वांनाच लागू असेल
दोन्ही लोकातील प्रमुख-प्रवक्त्यांनी म्हटले “चालेल” …
जोवर स्वर्ग-लोकी पाबंदी तोवर इहलोकातही बंदी
सगळंच बंद, मंदिरे-देव-देवतांची-पूजा-अर्चा-आरती
बाप्पा मोरयाची ही शक्कल अचूक काम करुन गेली
हातोहात चक्रं फिरली, स्वर्ग-प्रवेशाची पाबंदी उठली !
सुटकेचा निःश्वास टाकून, बाप्पांचा जयजयकार केला
या मजेशीर स्वप्नातून सत्यात आणणारा अलार्म वाजला …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🔆🕉️
Leave a Reply