कविता : 🌷’ स्वच्छंदी ‘

कविता :🌷’ स्वच्छंदी ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, ३० मार्च २०२३
वेळ : दुपारी, ४ वाजून ३८ मि.
फुटकळ गोष्टींकडे काणाडोळा केलेलाच बरा नाही का ?
हिशोब-बिशोब ठेवून उगीच स्तोम माजवून त्या गोष्टींचा,
पराचा कावळा करून तरी पदरात काय पडणार म्हणा !
प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्वं प्रचंड महत्वाचं वाटंत असतं,
प्रत्यक्षात मात्र ते “दरिया में खसखस” इतकंच असतं !
मग सत्य स्वीकारुन बिनधास्त जगायला काय हरकत ?
हवं तसं खुशाल वागून मनाजोगतं आयुष्य जगणं, गैर नव्हे
खर्याचं खोटं करुन फुकटचं लक्ष वेधणं किती हास्यास्पद !
आत्म-संतुष्ट राहून, लोकांना आनंद दिला तर बिघडलं कुठं ?
जगात कुणाही विना कुणाचं, अजिबात अडत नाही खेटर 
असं असताना “माझ्या पश्चात् सर्वांचं कसं काय होईल बरं “
असा सूर लावून फुकाची चिंता करण्यात काय आहे अर्थ ?
होणारं होत असतं, कुणाच्याही सांगण्यानं ते टळत नसतं !
एकवेळ “प्रयत्नांती परमेश्वर”सुध्दा प्राप्त होऊ शकतो पण,
ईश्वरी शक्तीच्या सूक्ष्म-संकेतांबद्दल सतर्क राहण महत्त्वाचं !
‘कुणी जगो वा मरो’, जगरहाटी अखंड चालू राहणार अविरत
मुंगी-सम इवलासा जीवही आयुष्य काढतो, कामात राहून गर्क !
तत्व “मुंगी साखरेचा रवा,”आचरणी आणण्यास काय हरकत ?
सूर्य-चंद्र-ग्रह-तारे त्यांच्या कक्षेत कायम राहतात कार्यरत 
सारेच जीव बंदी, आखलेल्या जीवन-कक्षेत फिरतात सतत 
स्वतःच्याच कक्षेत स्वच्छंदीपणे जगण्यास काय आहे हरकत  ?
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!