कविता -🌷' स्मृती-स्पंदने '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
भर पावसात चिंब चिंब भिजून
पाणी निथळत थेंब-थेंब होऊन
कुणी अचानक पाही चोरून
गोड शिरशिरी रोम-रोमातून !
लाज गालांवर लाली पसरुन
नेत्र चमकती भाव उचंबळून
लाट पसरली अंगा-अंगातून
स्वप्न देखणे अलगद उमटून...
सडा सुगंधी दरवळ पसरुन
चित्र सुंदर रंगांची उधळण !
नाद निनादत छन छन छननन
मन मोहरले चाहूल ऐकून !
कोण चित्रकार हा गगनी बैसून
रंग नभीचे मनात बरसून...
चित्र रेखितो रवी किरणांतून
वृक्ष वेलीही आल्या बहरून !
आणि आठवणी जाग्या होऊन
सृष्टी अवघी क्षणात थबकून
काया कोमल आली तरारुन,
कोकीळ कंठी स्वर झंकारुन...
🌷तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply