कविता – 🌷 ” सुवर्ण-संधी “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २२ नोव्हेंबर २०१६
सदा मोहोजाळ घालूनी वेटोळे …
अंगा वेढूनीया बसे, हेही न कळे …
अळू-पानासम जर मन असे तृप्त …
पाण्याच्या थेंबापरि राही, अलिप्त …
अतृप्तीच सर्वं वासनांचं खरं तर मूळ …
दुःखी-कष्टी करी जीवा, लावूनी खूळ …
बिलगून बसे मुंगी जशी, न सोडी गूळ …
मन-अधीन भरकटे, होऊनी दिशाभूल …
या अज्ञानाची असती अगणित झापडं …
मति-मंद, होई बंद, डोळे उघडे सताडं …
बुध्दी-भ्रष्ट-वागणं-बोलणं-करणं, बेबंद …
चुकीच्या जागी, मग शोधीत बसे आनंद …
अंतर्यामी बाळगून फुकाचाच उग्र दर्प …
महा-भयंकर फुत्कार मारी विषारी सर्प …
पापं करून-सवरूनही, करीतसे शंखं …
नेमकी संधी साधून हमखास मारी डंखं …
जमवल्या पापांच्या अगणित अशा राशी …
उन्मत्तपणा भरीस-भर, होताच तो राशी …
आता कितीही मोठी जरी झाली उपरती …
येणं शक्य नाही परत, निसटून गेली रेती …
सरळ-मार्गी जीवांना पडे, अति-संभ्रम …
न कळे, नेमकं काय करावे, होई विभ्रम …
मुजोर जीव मात्र सोकावें, बनूनी बेशर्म …
सोडी पूर्णच ताळतंत्र, लाज अन् शरम …
पापं करण्याचं पण लागू शकतं व्यसन …!
अंगची हुशारी, गैर-प्रकारांनी वापरून …
करीत सुटे अन्याय निष्पाप-जीवा छळून …
धरबंध सोडी, मग त्यजूनी सगळी-बंधनं …
उपकार करणाऱ्यांवरच लादून अत्याचार …
संपूर्ण विसरुनी भूत, उन्मत्त होतसे फार …
अधम मुजोर होऊन बेधडक करी दुराचार,
राजरोस अन्याय करुन माजवी हाहाकार …
हेच असे दुष्ट-दुर्जनांचं, प्रमुख लक्षण …
स्वार्थाने-अंध-वासनेत रममाण होणं …
त्याच भावनेनं ग्रासून, पिच्छा पुरवणं …
सर्वांच्या दुःखाचं एकमेव, हेच कारण …
८४ लक्ष योनींच्या खडतर भ्रमणा-नंतर,
सुदैवानं दुर्लभ मनुष्य-जन्म मिळाल्यावर,
विचार-पूर्वक खर्च करुया सद्-कारणांवर
अशी सुवर्ण-संधी, मिळणार नाही वरचेवर …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply