कविता :🌷’ सुवर्णसंधी ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, ११ एप्रिल २०२३
वेळ : १ वाजून ०६ मि.
‘जीवन’ म्हटलं की असणारच ऊन-सावली,
तरी त्यातली चाखायला हवी क्षणिक माधुरी
हसत-हसवत मस्त जगण्यातील मजाच न्यारी
हलक्या-फुलक्या आयुष्यातील वाढते खुमारी !
प्रत्येक दिवस हा जणू काही अंतिमच समजून,
ताण-विरहीत मनसोक्तपणे जर पाहीला जगून,
एरवी वाटणार्या त्रुटी-असुविधाही जातील पळून
जीवनातील क्षणन्-क्षण जाईल आनंदाने भरून !
किडुक-मिडुक गोष्टींवरुन होणार नाहीत वितंड वाद
जन्मजात-कद्रु-व्यक्तीतही उदारता जागृत होई खास
गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, स्त्री-पुरुष आदि भेदाभेद
लख्ख-प्रकाशानं जसं तम वितळतं, विरतील सगळेच !
खचितच यांमुळे आयुष्य जगण्याचा, कैफ वाढेल !
हेवे-दावे वैर-कटुता यांना अजिबात थाराच नसेल
त्यामुळे मनातला आप-पर-भाव मुळापासून संपेल
प्रत्येक जण आपलासा-हवाहवासा नक्की वाटेल !
अरण्य गाठून एकांतवास भोगणं म्हणजेच तपश्चर्या नव्हे !
वेगवेगळ्या रितीने, माणसांत राहून सुद्धा ती साध्य होते
मात्र त्यासाठी मनाचा ठाम निर्धार करता आला पाहिजे
चंचल-मनास मुरड घालून शिस्तीचं पालन झालं पाहिजे !
अर्वाचीन-काळापासून देव-मानव नित्य करताहेत यज्ञ
रूढ-पध्दतीशिवायही कैक प्रकारचे असू शकतात यज्ञ !
कुणी करु शकतात वाक्-यज्ञ तर कुणी क्रियाशील-यज्ञ
कुणी करतात लेखन-यज्ञ, कुणी सर्वप्रचलित नाम-यज्ञ !
साधना, तप, यज्ञ यापैकी काहीही मनापासून केलं तरी,
स्थूल-देहासह सूक्ष्म-पातळींवर, संस्कार होती मनावरही !
चौर्याऐंशी लक्ष योनी भटकून मनुष्य-जन्म लाभतो अंती,
त्याचं चीज करण्याची सुवर्णसंधी अजूनी आपल्या हाती !
तो सार्थकी लावण्याची सुवर्णसंधी अजूनी आपल्या हाती !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply