कविता - 🌷" सुगंधित झाली माती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
पावसाचं आणि धरणीचं,
कडाक्याचं भांडण झालं...
रुसून बदलला धरणीचा सूर
ते पाहून पाऊस पळाला दूर ...!
कधीच नाही भेटणार तुला,
पाऊस निघून गेला, सांगून ...
धरणीने ठणकावले निक्षून
मग सुसाट-कोसळशील-वरुन ...!
रागावून पाऊस पळून गेला,
काळे-काळे ढग घेऊन गेला ...
म्हणे, पूर्ण जिरवून टाकणार
धरणीचं गर्वहरणच करणार...!
धरणी पार हिरमुसून गेली ...
अन् सुकून गेल्या वृक्षवेली
तिच्या अप्रतिम सौंदर्याची,
जणू संपूर्ण रया ही गेली ...!
तिचं असं भेसूर-रूप पाहून,
पावसालासुध्दा आलं भरून ...
काय असतो उपयोग म्हणा
उगा फुकाचं भांडणं उकरून ..!
अंतकरणी मनातल्या मनात,
हळवी वसुंधरा बसली झुरत ...
पावसा आता ये ना रे धावत,
मनोमनी याचना होती करत ...!
न राहावून, विरही पावसाने
अखेरीस, ढगांना केले गोळा ...
त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते
तशातच स्वभाव विसरभोळा ...!
भन्नाट वाऱ्यावर होऊन स्वार,
तो धावतच सुटला भेटीसाठी
गाठभेट जेंव्हा झाली धरणीशी
पुरतीच सुगंधित झाली माती ...!
त्याच्या मनसोक्त कोसळण्याने
तृप्तीत शहारलं अवघं अंग-अंग ...
बघता बघताच पुन्हा अवतरला,
वसुंधरेचा हिरवा हिरवा-गार रंग ...!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply