कविता – 🌷  ” सुख हात जोडून उभं ” 

कविता - 🌷 " सुख हात जोडून उभं "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, २७ जून २०२४
वेळ - दुपारी, १२ वाजून ५६ मि.

सुख-दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू असूनही
माणूस सुखाच्या शोधात उगीचच होत असतो दुःखी

नाणं उंच उडवून दु:ख पार खाली ढकलून देत नाही
त्याऐवजी दु:खाचं स्तोम माजवून मागतो सहानुभूती

सुखाची बाजू वर खेचून आणणं, इतकं कठीण नाही
परंतु नेटाने प्रयत्नांचीच पराकाष्ठा करणं आहे जरूरी

स्वतः अंगास घस लावून न घेता-अपेक्षांचा डोंगर उभा
असा मानभावी माणूस जणू 'आयत्या बिळात नागोबा'

मंदिरी जाऊन देव-दर्शनापेक्षा इतरत्र चौफेर ठेवी नजर
अशा दांभिक व्यक्तीस मिळालेलं अमृतही वाटेल जहर

पूर्व-पुण्याईने एखाद्यास अमूल्य हीरा जर हाती लागला
अन् काच समजून फेकून देई बुद्धिवर जर पडदा पडला

अशा अभाग्याला सुखाचं वाढलेलं ताटही समजत नाही
वणवण भटकंती करतो, सुख हात जोडून उभं असूनही

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🔆🕉️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!