कविता - 🌷 " सुखाचे क्षण "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
चैत्र महिना म्हणजे माथ्यावर आग ओकणारा सूर्य,
भयानक-उष्ण-झळांनी हैराण, मानवी जीवन सर्व
पण अशाच आणीबाणीच्या वेळी वसंतऋतू येतो,
तनामनाला आलेली पूर्ण मरगळ, झटकून टाकतो
रणरणत्या उन्हातही वृक्ष वेलींना नवचैतन्य देणारा
सुगंधाची उधळण करीत, सुखदायी गारवा देणारा
सगळ्यांना संदेश देतो की प्रतिकूल परिस्थितीतही
न डगमगता हसूनच आला क्षण मस्त साजरा करा
वसंत ऋतू म्हणजे नव्यानं जन्म सुखी जीवनाचा
हा उत्सव, गंधांचा-सुरेल नादाचा-सुरेख स्वादांचा
पानांची नाजूक सळसळ, कोकिळेचे मधुर कूजन
रानोमाळ फिरणाऱ्या बेधुंद वा-याचं शीळ घालणं
ही सारी ऋतुराजाची रूपं डोळ्यांमधे साठवताना
सृष्टीच्या अप्रतिम सौंदर्याने अपार सुख भोगताना,
"हे सुखाचे क्षण कधीही संपू नयेत" प्रार्थना होतात
मनातल्या मनात भगवंताकडे, हेच मागणं मागतात
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply