कविता : 🌷 ” सुखाचं-कोंदण ”       


कविता : 🌷 " सुखाचं-कोंदण "        
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

माणसाचं आयुष्य...
तसं पाहायला गेलं,
तर बरचंसं हवंहवंसं...

जणूकाही-ते-अळवाच्या,
हिरव्यागार पानावरचा...
शुभ्र मोती चमकणारा...

जोवर तो सूर्य झळकतोय...
रविकिरणांतून ऊर्जा देतोय
मोत्याचा रूबाब पसरतोय...

पण सूर्यानं वळवता दिशा,
मोत्याचा उरला नुस्ता ठसा...
डोळ्यांदेखतच गायब होता...

त्याचा तो झगमगाट,
त्याचाच तो रूबाब,
अन् त्याचा तो दिमाख...

जेव्हा लागतो, उतरणीला...
कधी ओघातच काळाच्या,
होई गडप न कळे कुणाला...

माणसानं हेच सदैव...
लक्षात ठेऊन द्यावं...
जवानीच्या कैफात,
ना कधी हूरळून जावं...

नेहमी उगवत्या, सूर्याला
वंदन करते, सारी दुनिया
मावळतीच्या दिनकराला,
एक संध्येचा फक्त आसरा...

आयुष्याच्या अवस्था...
नानाविध दशा, छटा...
पालटतात, हांहां म्हणता...
भेडसावतात संध्याछाया...

जर हेच छोटंसं आयुष्यं ...
सत्कारणी लावता आलं,
माणसातलं माणूसपण,
शेवटपर्यंत जपून ठेवलं...

एकमेकांना हात देऊन,
जर पूर्ण सहकार्य केलं,
दुसऱ्याचं मन सांभाळत...
स्वतःचं मन थोडं मारलं...

संपूर्ण आयुष्यांचं होईल सोनं,
ते जगंणंच होईल सुवर्ण-क्षण...
आयुष्यात-सार्थकतेचं-आंदण...
त्यांवर चढेल सुखाचं-कोंदण...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!