कविता – 🌷 ” सुंदर असं एक नादब्रह्म “

कविता - 🌷 " सुंदर असं एक नादब्रह्म "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २८ ऑक्टोबर २०१६

सुंदर असं एक नादब्रह्म...
ज्याच्या विळख्यातून कधी
बाहेर येऊच नये
असं वाटतं...

ते मनाच्या सातकप्प्यातील...
सप्तसुरांच्या तारा छेडित
झंकारत राहतं...

श्रुती-श्रुतीला हलकेच स्पर्शुन,
एक ताल-ब्रह्म
निर्माण होत जातं...

विविध सुरावटींच्या...
सुरमयी विश्वात
मानस-हंस आत्मानन्दात
डुंबत राहातो...

अलगदरित्या, स्वयंला...
त्याच्या जडत्वापासून
विभक्त करीत असतो...

ओंकाराच्या मूळ-स्वरूपाकडे...
अंतर्मन नकळत
खेचलं जात राहातं...

तो प्रणव-स्वर...
सर्व मोहांची जाळी चिरत
अंतर्मनात तरंग
निर्माण करीत राहातो...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!