कविता : 🌷’ सुंदरता ‘

कविता : 🌷’ सुंदरता ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले 
तारिख : गुरुवार, १३ एप्रिल २०२३
सुंदरता म्हणजे फक्त सुरेख चेहरा-मोहरा ? सुंदरता म्हणजे चमकती नितळ काया ?
सुंदरता म्हणजे प्रमाणबध्द आकर्षक बांधा ? सुंदरता म्हणजे रेशमी लांबसडक केशरचना ?
त्या नियंत्याने अमाप अद्भुत् सौंदर्य निर्माण केलं आहे ! सृष्टीच्या कणाकणात चहूकडे ते ओतप्रोत भरलेलं आहे 
सुंदरता तनात, सुंदरता मनात, सुंदरता डोळ्यांत-रोमारोमात ! सुंदरता मोहक अवयवांत, लोभस हावभावात !
सुंदरता शौर्यात, अथांग प्रेमात, तरल प्रणयात !
बाजी प्रभू देशपांडे, भगतसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींच्या असामान्य महान् त्यागात !
एवढंच नव्हे तर पत्नीवरच्या प्रेमापोटी एखाद्या पतिनं केलेल्या त्यागात … पतिवरच्या प्रेमापोटी एखाद्या पत्नीनं केलेल्या त्यागात!
मुलांच्या कल्याणापोटी जन्मदात्या आई-वडिलांनी केलेल्या त्यागात …घरातल्यांसाठी कर्त्या भावानं-बहिणीनं केलेल्या त्यागात !
फक्त आणि फक्त अप्रतिम-अद्वितीय-अद्भुत् सुंदरताच प्रकटते या सर्वांच्या त्यागात !
सुंदरता मूक प्राण्यांच्या डोळ्यात, त्यांच्या मूक इशा-यात, पक्षी-पाखरांच्या मंजुळ किलबिलाटात !
सुंदरता झाडांच्या सळसळत्या पाना-पानात- त्यांच्या बहरात, सुंदरता बाळांच्या हसण्या-बागडण्यात-बोबड्या बोलात !
 
सुंदरता रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबा-थेंबात, सुंदरता भुरु-भुरु पडणा-या शुभ्र हिम-वर्षावात !
सुंदरता पाना-फुलांवर डौलानं विलसणा-या दव-बिंदुत, सुंदरता दिमाखात आभाळी झळकणा-या रम्य इंद्र-धनुत !
सुंदरता ओल्या मातीतून हळुच डोकावणा-या गवताच्या पात्यात, वसंत ऋतूच्या चाहूलीनं फुटलेल्या लालचुटुक कोवळ्या पानांत !
सुंदरता डोळे दिपवणा-या भव्य-दिव्य आकाशाच्या निळाईत, सुंदरता उगवत्या सूर्याच्या पहिल्या-वहिल्या तांबूस-सोनेरी किरणांत !
सुंदरता झुळूझुळू वाहणाऱ्या नद्यांच्या उगम-स्थानात, सुंदरता अतिविराट महासागराच्या भरती-ओहोटीत !
सुंदरता धो-धो कोसळणाऱ्या फेसाळत्या धुवांधार धबधब्यात, सुंदरता स्थिर, सुशांत, निश्चल जलाशयात !
सुंदरता मन-लुभावणा-या-लुकलुकणा-या लक्ष-लक्ष चांदण्यांत !
सुंदरता शांत-शीतल मनावर प्रभाव टाकणा-या पौर्णिमेच्या चंद्र-बिंबात !
सुंदरता दिमाखदार गगनचुंबी हिमाच्छादित पर्वत-रांगात, सुंदरता झाडा-पाना-फुलांनी डवरलेल्या द-या-खो-यात !
सुंदरता निरपेक्ष भावात, आचरणात, विचारांत, वचनात
सुंदरता लेखनात, काव्यात, संत-वाड़मयात, ललित साहित्यात
सुंदरता कवितेत, ओवीत, भूपाळीत, भजनात, भारूडात, पोवाड्यात, भावगीतांत
सुंदरता प्रत्येक नात्यात-आपलेपणात-मायेच्या ओलाव्यात-जिव्हाळ्यात !
सुंदरता म्हणजे हळुवार, नाजुक-भाव-भावनांच्या रेशीम-लडींची गुंतागुंत
सुंदरता म्हणजे पहाटे-पहाटे पडणा-या गोड-गुलाबी स्वप्नांतला आभास !
मुळात गहन प्रश्न असा पडतो की सुंदरता कश्यात नाही?
सौंदर्य-दृष्टी असेल तर चराचर-सृष्टीच्या कणाकणात सुंदरताच जाणवेल
अवघं विश्व सर्व स्तरांवर सर्वांगानं सौंदर्यानं नटलंय् हेच प्रकर्षानं जाणवेल !
कुणीसं किती यथार्थ म्हटलं आहे की ‘सुंदरता, बघणा-याच्या डोळ्यांतच नांदत असते !’
या संपूर्ण जगतात, सुंदरता नाही अशी एकही व्यक्ती, प्राणी, जीव वा वस्तू अस्तित्वात नाही !
‘कुरुपता’ ही निव्वळ बघणा-याच्या सदोष दृष्टिकोनाचा-सदोष मानसिकतेचा-दुष्परिणाम आहे !
@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!