कविता – 🌷 ” जणू साक्षात्कार “

कविता - 🌷 " जणू साक्षात्कार "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २८ ऑक्टोबर २०१६

शुचिर्भूत तन आणि मन...
कैलास मानसरोवर-चिंतन...
वा तत्सम पवित्र स्थान
अंतरी श्वासागणिक
नाम-जप-यज्ञ...

मन, चित्त, पावन...
चराचराशी तादात्म्य पावून
जणू ब्रह्मचैतन्य
संवेदना बनून
सळसळती स्पंदनं...

जणू ओंकार-रूपाचा...
साक्षात्कार होऊन,
जड-देहाचं प्रकाशात
विलीन होणं...

निज-रूपाची आस
लागलेला जीव...
स्व-चिद्-दर्शनानं...
धन्य-धन्य होऊन
पूर्ण तृप्त होणं...

सर्व जड अन् सूक्ष्मातिसूक्ष्म...
जाणिवांचा अंत होऊन...
ब्रह्मानंदी टाळी अशी लागणं...
कि आत्माराम-परमात्म्यात
एकरुप,
एक-स्वरूप बनून,
प्रकाशमान होऊ लागणं....

अंतर-आत्म्याच्या खोल
गाभाऱ्यात डोकावून...
निज-रूपाची अंधुकशी
ओळख पटणं...

जिवा-शिवाची गाठ पडूून...
त्या दैदिप्यमान
ओंकार-स्वरूपात...
सहजी विलीन होत जाणं...

एक सुंदर असं नाद-ब्रह्म
प्रत्यक्षात साकारणं......

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!