कविता : 🌷 ‘ साकडे ‘

कविता – 🌷‘साकडे‘

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले

तारीख – शनिवार, १४ सप्टेंबर २०१९
वेळ – १० वाजून ५३ मि.

आई अंबाबाई तुला घालिते गं साकडे,
भूल-भुलैया दुनियेचे मोहमयी गं रूपडे

अनोळखी रस्ते, अस्ताव्यस्त पसरलेले
निरागस जीवाला फसविण्यास टपलेले
अवघी अंधेर-नगरी कुणी कुणाचा नाही
हळव्या पाडसांना तुझाच आधार गं आई 

साता जन्मांची पुण्याई आली फळाला
म्हणून तुझा वरद-हस्त आम्हां लाभला 
तव दर्शनाच्या ओढीने जीव गं आतुरला
तव कृपा-वर्षा होता भक्तिभाव अंकुरला

सौभाग्याने पदरी चंद्र-सूर्य गं झळकले,
झाकोळले कधी आकाश, तेज चमकले
तुफानी लाटांनी जरी तांडव नृत्यही केले,
तव आशिर्वादाने, मन कधी न डगमगले !

पहाटे-पहाटे अंधार संपून तांबडे फुटू दे
सारं काही सुकर-सफल उजळून निघू दे
अज्ञानी-अबोध लेकरांस सद्बुद्धी देई माते 
वाट चुकलेल्या जीवांना, सन्मार्ग लाभू दे !

हाक मारली आता निश्चिंत मन हे झाले,
सत्कर्मी जीव रमून जीवन-सार्थक झाले 
आईच्या कुशीत मज निज-रूप ते दिसले !
डोळे मिटून सद्चिदानंदी एकरूप ते झाले

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!