कविता : 🌷 ‘ सहनशीलता ‘

कविता : 🌷 ‘ सहनशीलता ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, २५ मे २०२३
वेळ : ११ वाजून ४३ मि.
खरंच किती गूढ-अगम्य आहे मानवी जीवन
जन्म होतो-संस्कारांचे सोपस्कार होतात पण,
फारकाळ कधी-कुठे रमतच नाही चंचल मन  
कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे सतत वागतो आपण !
खरं तर जेव्हा कशाचाच भरवसा वाटत नसतो,
आलेला प्रत्येक अनमोल-क्षण वाया का दवडतो?
खुळ्या सारखे सुखाच्या भ्रामक कल्पनेत रमतो !
हातचं सोडून पळत्याच्या मागेच मोकाट धावतो !
स्वभावानं सहनशील असणं ही चांगलीच गोष्ट 
आणि ती प्रयत्नान्ती, नक्की वाढवायलाच हवी
पण दुसऱ्यांनी गृहीत धरावं इतकीही ती नसावी 
चुकीचा पायंडा बिल्कुल न पाडणारी ती असावी
अरेरावी-मग्रूरीला खत-पाणी घालणारी ती नसावी 
गरजवंताला मदतीचा हात पुढे करणारी ती असावी
स्वतः सहन करुन, चुकीची दुरुस्ती तर होतच नाही !
चूक करणार्याच्या लक्षात ती आणून द्यायलाच हवी !
त्यासाठी बाचाबाची-भांडण करण्याची गरजच नाही,
काम होऊ शकतं हसून-खेळून-सहानुभूती दाखवूनही 
जाणीव झाल्यावर ती चूक, तो पुन्हा करणारही नाही !
अन्यथा चुकणार्यांची संख्या कधी कमी होणारच नाही !

जसं सत्पात्री केलेलं दानच ठरतं पुण्यप्रद अन् फलदायी
तसं सहनशीलता व्यक्त करण्यास, व्यक्ती सुयोग्यच हवी !
अपात्र-अयोग्य व्यक्तींसाठी ती सपशेल होईल अनाठायी 
तुम्ही-आम्ही मिळूनच समाज बनतो म्हणून नको दिरंगाई !

पूर्ण साक्षी-भावाने स्वतःच्याच जीवनाकडे निरखून पाहता,
निसटेल ‘ग’ च्या बाधेची-डोक्यात-कोंडलेली-सगळी-हवा, 
आसमंतात पार मिसळून देईल सकस-असा दृष्टिकोन-नवा !
‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हाच मंत्र हवा !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!