कविता : 🌷 ” सद्-कर्म-यज्ञ, आईचा “

तारिख – रविवार, १९ मार्च २०१७
कवितेचं नाव-🌷” सद्-कर्म-यज्ञ, आईचा ” 
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 

एका गोष्टीची आहे खात्री 
शंभर टक्के अगदि नक्की …

गेल्या,शत-जन्मांत एखादं काहीतरी,
सत्कर्म हातून घडलं असावं नक्की

त्या शिवाय इतक्या महान,
आई-वडिलांच्या पोटी जन्म …
घेऊ शकणं केवळ अशक्यच …

आई जी आद्य-गुरू,तिच्या विषयी 
कितीही लिहीलं तरीही आहे कमी …

जेव्हा एखादि व्यक्ति आपल्याला, 
रात्रं-दिवस नजरे-समोरच दिसते,
गृहीत धरतो बर्याचदा,आपण तिला

तिची होती,अत्यंत साधीशी राहणी …
अन् उच्चतम कृती व विचारसरणी …

नावाप्रमाणेच शांत स्वभाव
लाखामध्ये एखाद्या व्यक्तित
शोधून मिळणं कठीण असतं 

जे भाग्यानं,पदरी आहे त्यातच आनंदी …
असिम-कष्टांची पर्वा केली नाही कधी …

कितीही संकटं जरी आली,
तरी तोंडातून चकार, ब्रं नाही …
की ती कधी डगमगली नाही …

स्वकर्तव्य नीट काटेकोरपणे 
पण नेहमी आनंदानेच करणे …

कोणत्याही त्रुटि, तिला कधीच
” त्रुटि ” म्हणून वाटल्या नाहीत …

मिरजेच्या प्रशस्तं जागेमधून,
गोरेगावच्या दोनच खोल्यांत,
राहूनही घेतलं सारं सांभाळून …

नामस्मरण-जप जणू श्वासा समान 
परोपकार,सत्कार्य जणू जेवणखाण 

अत्यंत शिस्त-बद्ध, 
नियम-बद्ध वागणं …

अतिशय दांडगं वाचन, 
तितकंच मनन, चिंतन …

कथा-काव्य-साहित्य यांची 
मनापासून तिच्या आवडीची 

सर्व प्रकारच्या कलांचा आनंद
घेत असे, रसिकतेने रसास्वाद …

आईच्या बाल-पणीच्या त्याकाळी,
मुलींच्या शालेय-शिक्षणावर पाबंदी …

तशात आईची होती, सावत्र आई …
आईला होती तीन सावत्र भावंडं …

तिने कधी त्यांस सावत्र मानलं नाही
सख्खं नातं मानून उदंड माया केली …
शाळेत जाऊन, आईने शिकणं
म्हणजे, वेळ वायाच घालवणं
घरात हेच ठाम मत असल्यानं,

आईने फक्त एक दिवसच,
शाळेला जाऊन आल्यावर,
तिचं शाळेत जाणं बंद केलं गेलं !!

अन् आईच्या जवळपासच्या वयाचीच
तीन-भावंड सांभाळायला घरी, बसवलं …

आईची, अतिशय कुशाग्र बुद्धि होती …
स्वतःहून, लिहीणं-वाचणं शिकली ती !

भगवत-गीतेपासून,दासबोध पर्यंत …
ज्ञानेश्वरी पासून सर्व संत-वाङमय … 
लोकमान्य टिळकांचं, गीता-रहस्य …

अनेकानेक पुस्तकं,मासिकं,कथा,लेख,ग्रंथ
विविध प्रकारच्या ललित साहित्याची आवड 

पण तिचं मन, खरं रमे, आध्यात्मिक रचनांत …
त्यामुळे,आध्यात्मिक-रुची-प्रगति होती अफाट 
व्यक्त नाही केलं, पण ती प्रविण होती कवनात …

तिचं आध्यात्मिक-ज्ञान विस्तृत व सखोल होतं …
हातांनी काम-मुखानं नाम-जप सुरुच असायचं …

असा तिचा दुहेरी सद्-कर्म-यज्ञ अखंड चालायचा …
पण कधीच कोठेही तिनं याची केली नाही वाच्चता …

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
 🙏�🌅🕉🌷🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!