कविता – 🌷 ” संक्रमण-सन्मार्गाकडे “


कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेल

सूर्याचा मकर-राशीमध्ये प्रवेश म्हणजेच सूर्याचे संक्रमण
संकटांवर मात, शुभ-कालारंभ-मकर संक्रांतीचे आगमन

सहा-मास दक्षिणेत वास्तव्य म्हणजे'पितृयान'-दक्षिणायन
सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना सुरु सूर्याचे उत्तरायण

दक्षिणायन संपल्यावर सूर्याचे शुभ-संक्रमण, प्रकाशाकडे
हे द्योतक, अंधारलेली वाट संपवून पावन-पर्व-आरंभाकडे

असत्यांनी ग्रासलेल्या विश्वापासून, मार्ग-दर्शक सत्याकडे
प्रलोभनांनी बुरसटलेल्या अधोगती पासून प्रगती-पथाकडे

शतकानुशतकं दु:खात पिचण्यापासून-यथोचित-सुखांकडे
युद्धं-भांडणतंट्यांपेक्षा-विशाल दृष्टिकोनाच्या-सलोख्याकडे

कार्यरत राहूनच वाटचाल करुया, दारिद्र्यातून-श्रीमंतीकडे
श्रीमंती मनाची-सत्कर्मांची-चांगुलपणाची-सुसंस्कृतपणाची

मधुर-कृती-सुमधुर-वाणी-नात्यांतील-गोडवा वाढे कणकण
तीळ-गुळ-खमंग गुळ-पोळी-रंगीत-पतंग, मौजमस्तीचे-क्षण

मना-मनांना जोडणारा, मकर-संक्रांतीचा हा महत्त्वपूर्ण सण
या सत्कर्म-यज्ञाने, नवपिढीवर होई संस्कारांची जडण घडण

भ्रष्टाचार-अन्याय-चोरी-दांभिकता-शत्रूत्व-क्रूरपणाचे वावडे...
अठरा-पगड-वाममार्ग त्यागून-करुया वाटचाल सन्मार्गाकडे...

सूर्य-संक्रमण जरूरीचं तसंच अज्ञान सोडून, जाणं ज्ञानाकडे...
आपण सर्व संक्रमण करुया चला काळोख सोडून उजेडाकडे...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!