कविता : 🌷’ शोध ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले वो
तारिख : शुक्रवार, २८ जुलै २०२३
वेळ : दुपारचे २ वाजून ३५ मि.
उभं आयुष्य फक्त सुखाचा ध्यास असतो
त्यामुळे झापडं बांधून जणू घोडाच बनतो
सुखाच्या पाठीमागून स्वैर धावतच सुटतो
क्षणिक थांबून विचार करायला वेळ नसतो
लहान वयात सारं कोड-कौतुकच असतं
पण तारुण्यात पुन्हा तेच करावंसं वाटतं
तरुणाई कधी ओसरली याचं भान नसतं
यंत्रवत जीवन ढकलणं पुढे चालूच राहतं
जीवनाच्या-तिसऱ्या-टप्प्यात जाग येते,
सुधारण्याची थोडीफार धडपडही होते !
पण एव्हाना तन-मन दोन्ही बंड पुकारते
केविलवाणी धडपड मग हातपाय गाळते !
बिकट परिस्थितीत आतून ऐकू येतो बोल,
“सुख बाहेर शोधण्यापेक्षा मनांतर्गत शोध”
“मनाला लगाम घालून, आवर आता क्रोध”
“शांत-स्थिर-चित्त”अमूल्य-अंतस्थ-गुरुबोध
काम-क्रोध-लोभ-मदादि षडरिपु सर्व नश्वर,
अंतरीच्या गाभाऱ्यात स्थित, काशी-रामेश्वर
प्रफुल्लित मनात वसते कैलास-मानसरोवर
मनाच्या काना-कोपऱ्यात स्थित असे ईश्वर !
शोध घ्यायचा असेल तर हवी ‘मानस’यात्रा
अन्यथा सर्वत्र मानवी-खल-वृत्तींचीच जत्रा
क्षणभंगुर जीवनी जर हवी चिरंतन शांतता,
तर अंगी बाळगायला हवी नितांत-कृतज्ञता !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply