कविता : 🌷" शब्द-वैभव "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
शब्द जगता,
आला पाहिजे ...
भिष्माच्या प्रतिज्ञेसारखा ...
शब्द जागवता,
आला पाहिजे ...
कर्णाच्या उदारतेसारखा ...
शब्द फेकता,
आले पाहिजेत ...
कसलेल्या नटसम्राटासमान ...
शब्द पाळता,
आले पाहिजेत ...
एकलव्याच्या त्यागासमान ...
शब्द-वैभव जोपासता
आले पाहिजे
स्वातंत्र्यवीर सावरकरांसमान ...
शब्द फुलवता,
आले पाहिजेत ...
महाकवी कालिदासासमान ...
शब्द-न्-शब्द गाता,
आला पाहिजे ...
गान-कोकिळेसमान ...
शब्द पिसारता,
आले पाहिजेत ...
मयुराच्या पिसा-यासमान ...
शब्द-न्-शब्द भिडवता,
आले पाहिजेत ...
कुसुमाग्रजांच्या लेखणीसमान ...
शब्द टोलवता,
आले पाहिजेत ...
सचिनच्या षट्कारांसमान ...
शब्द-न्-शब्द दरवळवता,
आले पाहिजेत ...
प्राजक्ताच्या सड्यासमान ...
शब्द-न-शब्द जतन करता,
आले पाहिजेत ...
बकुळीच्या फुलांसमान ...
शब्द सत्यात उतरवता,
आले पाहिजेत ...
छत्रपती शिवाजीराजांसमान ...
शब्द-ब्रह्म साकारता,
आलं पाहिजे
महर्षि वेद-व्यासांसमान ...
शब्द पथ-दर्शक,
झाले पाहिजेत ...
अंतर्स्थित गुरूसमान ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply