कविता – 🌷 ” विचार-मंथन “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शुक्रवार, ८ सप्टेंबर २०१७
विसरणं कठीण आहे ते डोळे वटारून बघणं
खोड्या करणार्यांना खडू नेम धरून मारणं
खोडसाळ विद्यार्थ्याला पट्टीने चोपून काढणं
गृहपाठ न केल्यास, ओणवं धरुन उभं ठेवणं
कविता पाठ नसली तर वर्गाच्या बाहेर काढणं
गलका झालाच तर डस्टर टेबलावर आपटणं
त्यांच्या सेंडॉफच्या दिवशीचं त्यांचं गहिवरणं
सगळं काही मनापासून, त्यात दिखावा नसणं
आत्तासारखं फक्त वरवरचं,
बेगडी असं काहीच नव्हतं,
सगळं कसं स्वच्छ, पारदर्शक
वावच नव्हता दिखाऊपणास
सर्व शिक्षक अन् विद्यार्थी-वर्ग
साधे-सरळ, ध्येयानं भारलेले …
आज जर का मागे वळून पाहिले,
तर समजेल नक्की काय हरवले
सरळसोट विचार, संस्कार
आज किती दुर्लभ झालेत …
या स्वार्थी बाजारू जगात,
आज किती दुर्मिळ झालेत …
त्यांची कमतरता या जगतीं,
कशी होणार सांगा भरपाई ?
जाणीव होतेय, फिर-फिरूनी
सुदैवे लाभलेल्या त्या छत्राची …
त्या आदर्श शिक्षकांची स्मृति
पूर्वपुण्याईची ही ईश्वरी नाती
शिक्षक-दिन साजरा करतानाचं विचार-मंथन
सगळ्या शिक्षकांना आदरसहित त्रिवार वंदन …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷🙏
Leave a Reply