
कविता : 🌷 " वरदान "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
नजरेत इंद्रधनू भरता,
हर्ष होतो जीवाला...
मन मोहरुन जाते...
श्वास गंधाळतो जरा...
समोर सागर असता,
जणू नजर खिळून जाते...
हरवलेल्या जीवाला,
मग नजर शोधत बसते...
समोर चंद्र दिसता,
जगण्याची नशा चढते...
मोग-याच्या धुंद श्वासात,
अवघीच रात्र सरते...
समोर सूर्य असता,
लज्जित होते धरा...
झुळूझुळू वाहे वारा,
फुलता किरणांचा पिसारा...
असे नजरेत भरणे,
साधेसुधे मुळीच नसते...
हे नक्षत्रांचे देणे,
जन्मांचे वरदान ठरते...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply